
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला नागरिकांनी विरोध दर्शविण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात अबालवृद्ध नागरिकांनी सहभाग घेतला. पंढरपूर कॉरिडॉर हा या तीर्थक्षेत्राचे वैभव, पावित्र्य आणि परंपरा नष्ट करणारे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
यापूर्वी देशभरात जिथे जिथे कॉरिडॉर झाले आहेत त्याठिकाणी देवदेवतांची मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर पंढरपूर मध्ये कॉरिडॉर लादला जात आहे. देशाच्या नेतृत्वाला तीर्थक्षेत्राचे नाव पुसून पर्यटन क्षेत्र करण्यात अधिक रस आहे. पंढरपूर हे प्राचीन शहर आहे या शहराला आध्यात्मिक महत्व आहे. कॉरिडॉरमुळे या शहराची ओळख पुसली जाणार असल्याने, कॉरिडॉरबाबत वारकरी संप्रदायात संतापाची भावना आहे. त्यामुळे कॉरिडॉर रद्द करावा या मागणीसाठी श्री विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी आपली दुकाने बंद ठेवत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी कॉरिडॉरचा कडक शब्दांत निषेध करीत रद्द करण्याची मागणी केली.
































































