हवामान परिषदेला आदिवासींचा घेराव

संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेचे आयोजन करताना ‘अॅमेझॉन’च्या पर्जन्यवनांवर अवलंबून असलेल्या आदिवासी समुदायाच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन ब्राझीलने दिले होते. मात्र गेल्या आठवडय़ात सुरू झालेल्या या परिषदेत समुदायाचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही त्यामुळे नाराज झालेल्या आदिवासी समुदायाने हवामान परिषदेच्या परिसरात आंदोलन केले.

  ‘कॉप-30’च्या मुख्य ठिकाणाच्या प्रवेशद्वारावर हवामान बदल आणि इतर मुद्दय़ांवर मागण्या मांडण्यासाठी आदिवासी जमले. त्यांचा मोर्चा शांततापूर्ण असला तरीही त्यामुळे परिषदेतील सहभागींना बाजूच्या दरवाजातून आत जावे लागले.

ब्राझीलमधील सैनिकांनी आंदोलकांना रोखले. पारंपरिक आदिवासी पोषाखात असलेल्या आंदोलकांनी प्रवेशद्वारावर मानवी साखळी तयार केली. कार्यकर्त्यांच्या इतर गटांनी त्यांच्या भोवती दुसरी साखळी तयार केली. पर्यावरणीय गट ‘डेब्ट फॉर क्लायमॅट’मधील पाओलो डेस्टिलो यांनी आंदोलकांसोबतच्या मानवी साखळीत सहभाग घेतला आणि आदिवासी समुदायांना त्यांचा आवाज ऐकून घेण्याची संधी द्यावी, अशी मागणी व्यक्त केली.