
शहर आणि उपनगरांत रविवारी सीएनजीचा गंभीर तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे शहरातील अनेक सीएनजी कंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अचानक झालेल्या तुटवडय़ामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. आरसीएफ कंपाऊंड येथील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम शहरातील सीएनजीच्या पुरवठय़ावर झाला.
मुंबई शहरात महानगर गॅस लिमिटेडकडून मोठय़ा प्रमाणावर गॅसचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा रविवारी गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमधील बिघाडामुळे विस्कळीत झाला. विशेषतः पश्चिम उपनगरातील सीएनजी कंपांना त्याचा मोठा फटका बसला. वांद्रे, अंधेरीपासून बोरिवली, दहिसर परिसरातील सीएनजी पंपांवर सीएनजीचा तुटवडा जाणवला आणि तेथे वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुपारपासून परिस्थिती आणखी गंभीर बनली होती. महानगर गॅस लिमिटेडमार्फत घरगुती पीएनजी ग्राहकांना प्राधान्याने अखंडित पुरवठा केला जातो. पण एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला वायू पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांचे हाल झाले. दरम्यान, घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय गॅस पुरवठा केला जाईल, असे महानगर गॅस लिमिटेडकडून स्पष्ट करण्यात आले. गॅस प्रोसेसिंगच्या तांत्रिक बिघाडामुळे शहरातील अनेक सीएनजी स्टेशन बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महानगर गॅस लिमिटेडने खबरदारीचा अलर्टदेखील जारी केला आहे.
बेस्ट, टॅक्सी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
सीजीएस वडाळा येथील गॅस पुरवठा बंद झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, असे जाणकारांनी म्हटले आहे. सीएनजी पुरवठा सुरळीत होईपर्यंत टॅक्सी, ऑटोच्या सेवेसह बेस्ट बस व इतर सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ठाणे, नवी मुंबईतील सीएनजी स्टेशनना झळ
गेलच्या मुख्य गॅसपाईपलाईनच्या बिघाडाचा मुंबईसह आसपासच्या परिसरांना फटका बसण्याची भीती आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी स्टेशन बंद होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


























































