
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी राज्य शासनाने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांची सचिवपदी तर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी 27 सप्टेंबर 2016च्या शासन निर्णयान्वये उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास आणि संस्था स्थापन करण्यात आलेली होती. उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये न्यासाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. स्मारकावरील पदसिद्ध सदस्य वगळता अध्यक्ष आणि सदस्यांची पदे भरण्याबाबतचे आदेश 13 मार्च 2020 रोजी काढण्यात आले होते.
शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. तर पराग आळवणी आणि शिशिर शिंदे यांची तीन वर्षांकरिता सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे स्मारकावर पदसिद्ध सदस्य आहेत. स्मारकाची दोन सदस्यपदे रिक्त असून ती सर्वसाधारण सदस्यांमधून भरली जाणार आहेत असे निर्णयात नमूद आहे.






























































