
स्कूल व्हॅन चालकाने तीन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची घटना विलेपार्ले येथे घडली आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी चालकाला अटक केली. तक्रारदार महिला या सांताक्रुझ येथे राहतात. त्यांची मुलगी विलेपार्ले येथील एका नामांकित शाळेत शिकते. अटक आरोपी हा मुलींना शाळेत ने-आण करण्याचे काम करतो. अटक आरोपीने मुलींना शाळेच्या व्हॅनमध्ये बसवताना त्यांच्याशी गैरवर्तन केले. मुलीशी नकोसे कृत्य करून विनयभंग केल्याचा आरोप आहे. याची माहिती मुलींनी त्यांच्या पालकांना दिली. त्यानंतर जुहू पोलिसांनी गुन्हा नोंद करून चालकाला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


























































