
रत्नागिरीच्या राजकारणात गेली 21 वर्ष एक लबाड लांडगा आहे. आज भाजपाच्या तीन उमेदवारांना शिंदे गटात घेऊन उमेदवारी त्यांना द्यावी लागते यावरून त्यांची अवस्था जनतेला समजली आहे. भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनाही छोट्या शिंदे गटात जाऊन निवडणूक लढवावी लागते हे दुर्दैव आहे, अशी टीका पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी केली. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांना आव्हान देत सांगितले की, प्रचाराला जाताना पालकमंत्री उदय सामंत यांनी ४४ कोटी रूपयांच्या डांबराचे चलन जनतेला दाखवावे.
बाळ माने म्हणाले की, आज आमच्या महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), कॉंग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे, वंचित बहुजन आघाडी, बसप सहभागी झाले आहेत. एका जागेवर आज बसपच्या उमेदवारांने अर्ज भरला आहे. काही ठिकाणी एकापेक्षा दोन अर्ज भरले असले तरी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रत्नागिरी शहरात शंभर टक्के महायुती पहायला मिळेल, असा विश्वास बाळ माने यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी सावंत-माने या मोठ्या फरकाने विजयी होतीलच त्याचबरोबर शहरातील सर्व ३२ जागा आम्ही जिंकून रत्नागिरीकरांना एक चांगले प्रशासन देताना शहराचा विकास करू. आज शहरात खड्डेमय रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता आहे. आज हिवताप, डेंग्यू आणि कावीळ सारखे आजार होत आहेत. उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागतं आहे, हे दुर्दैव आहे. म्हणून आम्ही शहरात एक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारू, असे माने यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर, जिल्हाध्यक्ष नरूद्दीन सय्यद, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, मनसेचे अविनाश सौंदळकर उपस्थित होते.
बेईमानीपेक्षा इमानदारी काय हे राजेश सावंतानी दाखवले
उदय सामंत सुरतमार्गे गुवाहाटी पळून गेले. पण राजेश सावंत यांनी बाप काय असतो हे दाखवून दिले. उदय सामंत यांना पळून जायचं होतं, तर राजीनामा देऊन जायचं होतं. आपली मुलगी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवते म्हणून इमानदारीने राजेश सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, हे सामंतासाठी मोठं उदाहरण आहे, अशी खोचक टीका उपनेते बाळ माने यांनी केली.

























































