
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महायुती सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ब्राह्मण समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी कर्ज व्याज परतावा योजना जाहीर केली आहे. मुख्य म्हणजे ब्राह्मण समाजासाठी घोषित झालेली ही वैयक्तिक आर्थिक लाभाची पहिली योजना आहे. ब्राह्मण समाजाशिवाय राजपूत आणि आर्य वैश्य समाजातील घटकांसाठीही हीच योजना लागू करण्यात आली आहे.
सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने विविध समाजांना आकर्षित करण्यासाठी महामंडळे स्थापन करण्याच्या घोषणाचा सपाटा लावला होता. त्यानुसार ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास, राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप तर आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक महामंडळ स्थापन केले होते. यापैकी फक्त परशुराम महामंडळावर अध्यक्षांची नेमणूक झाली आहे. या महामंडळांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात आले आहे. मात्र स्थापनेपासून ही तिन्ही महामंडळे कागदावर होती. आता नगरपालिका, नगर पंचायत, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महामंडळाच्या योजना जाहीर केल्या आहेत.
- नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तिन्ही समाजघटकातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय, उद्योगासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. प्रतिवर्षी 50 लाभार्थींना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळेल.
- लाभार्थ्याने 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे आणि व्याजाचे हप्ते वेळेवर भरल्यास बँकेकडे भरलेल्या व्याजाची रक्कम दरमहा महामंडळाकडून लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाईल.
- गट कर्ज व्याज परतावा योजनेत 50 लाखांपर्यंत मंजूर झालेल्या कर्जावरील नियमित परतफेड केलेल्या व्याजाचा परतावा दिला जाईल. हा परतावा कमाल 15 लाख रुपयांपर्यंत असेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
- लाभार्थ्याने 15 दिवसांच्या आत दरमहा हप्ता आणि व्याज भरल्याची माहिती दिली नाही तर त्या हप्त्यातील व्याजाचा परतावा दिला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.




























































