
मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून अजित पवार गट व भाजपमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले आहे. अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चंग बांधलेले भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी दहशत माजवल्याचा आरोप होत आहे. मात्र, अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी पहाटे 5 वाजता गनिमी काव्याने नगर पंचायतीत पोहचत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत राजन पाटील यांना धोबीपछाड दिला आहे.
अनगर नगरपंचायतीत भाजपध्ये अलीकडेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी आपल्या सुनेला निवडणुकीत उतरविले आहे. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाने उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये यासाठी राजन पाटील व त्यांच्या समर्थकांकडून साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करत दबाव आणला जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना प्रशासन व हत्यारबंद गुंडांकडून धमक्या दिल्या जात असतानाही थिटे यांनी आज सकाळी 5 वाजता नगरपंचायत कार्यालय गाठून सकाळी अकराच्या सुमारास निवडणूक अधिकारी सचिन मुळिक यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
हत्यारबंद गुंडांकडून गाडीचा पाठलाग
- उज्ज्वला थिटे अर्ज भरायला जात असताना अनगरच्या रस्त्यावर हत्यारबंद गुंडांची फौज उभी करण्यात आली होती. काहीजण त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. तर, रस्त्यावर उसाचे ट्रक्टर उभे करून अडथळा आणल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला आहे.
- अनगर नगरपंचायतीत सदस्यपदाच्या सर्व 17 जागा माजी आमदार राजन पाटील बिनविरोध झाल्या आहेत. या सर्व जागा भाजपच्या पदरात पडल्या आहेत.




























































