
बाळासाहेबांनी हिंदूंकडे कधी व्होट बँक म्हणून पाहिले नाही. त्यांच्यासाठी हा अस्मितेचा आणि धर्माप्रतीच्या प्रेमाचा विषय होता. त्यामुळेच त्यांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱयांची किंवा त्यावर मतं मागणाऱयांची गंमत वाटते, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लगावला.
राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट लिहित शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना उजाळा दिला. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच होते, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. बाळासाहेब हे कमालीचे हिंदूप्रेमी होते, मात्र प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद त्यांनी कधी सोडला नाही. त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळेच बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱयांची किंवा त्यावर मतं मागणाऱयांची गंमत वाटते. त्यांना ना बाळासाहेब माहीत आहेत, ना प्रबोधनकार. ऐकणं आणि वाचण्याचा दुष्काळ असल्यामुळे तसे असू शकते. पण त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती याची पुसटशीदेखील कल्पना नाही, असे राज ठाकरे
म्हणतात.
राजकारणाआधी समाजकारण
फक्त मते, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसे ओरबाडणे म्हणजे राजकारण हे सध्या रूढ होत आहे. अशा वेळी समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱया बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन, असे राज ठाकरे यांनी शेवटी म्हटले आहे.





























































