
शहरातील सहा बडय़ा विकासकांनी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संक्रमण शिबिराचे तब्बल 120 कोटी रुपयांचे भाडे थकवले आहे. या विकासकांच्या सध्या सुरू असलेल्या बांधकामाला ‘स्टॉप वर्क’ नोटीस द्यावी तसेच घरांच्या विक्रीला स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारे पत्र शिवशाही पुनर्वसन कार्यालयाने एसआरएला पाठवले आहे. झोपडय़ांचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांची तात्पुरती निवाऱ्याची सोय म्हणून बिल्डर त्यांना संक्रमण शिबिरात घरे देतात. त्यासाठी विकासक शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून संक्रमण शिबिरे भाडे तत्त्वावर घेतात. 40 हजार रुपये डिपॉझीट आणि 8 हजार रुपये भाडे एका घरासाठी शिवशाहीकडून आकारले जाते. वारंवार नोटीस पाठवूनदेखील सहा विकासकांनी अनेक वर्षांपासून थकीत भाडे न भरल्यामुळे थकबाकीचा आकडा 120 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.































































