
ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात येणाऱ्या तीन फ्लायओव्हरसाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने एमआयडीसीकडे ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या तिन्ही पुलांवर एकूण ९०० कोटी रुपयांचा खर्च होणार असून सध्या इस्टीमेट काढण्याचे काम सुरू आहे. या पुलांचा निम्मा खर्च उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाने एमआयडीसीला पत्र पाठवले आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर दरदिवशी मोठी वाहतूककोंडी होते. सायंकाळी ऐरोली आणि रबाळे परिसरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्याचा जोरदार फटका वाहनचालकांबरोबर स्थानिक नागरिकांनाही बसतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहनांची संख्या आणखी वाढणार असल्याने वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने किस्ट्रल हाऊस ते पावणे गाव, रबाळे जंक्शन आणि बीएसएफ कंपनी ते हुंदाई शोरूम या ठिकाणी तीन मोठे फ्लायओव्हर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएफ कंपनी ते हुंदाई शोरूमपर्यंत पूल हा डबलडेकर असणार आहे. या तिन्ही उड्डाणपुलांवर आणि ठाणे-बेलापूर मार्गाच्या अन्य कामांवर सुमारे ९०० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे
ठाणे-बेलापूर मार्गाचा वापर एमआयडीसील ाही होतो. एमआयडीसीत जाण्यासाठी कामगार आणि वाहनचालकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो. एमआयडीसीत सध्या गृहनिर्माण संकुले उभी राहत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा अतिरिक्त ताण या मार्गावर पडणार आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर अनेक ठिकाणी फ्लायओव्हर बांधण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही या मार्गाची वाहतूककोंडीतून सुटका झालेली नाही. सायंकाळी या मार्गावरून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तुर्भे रेल्वे स्थानकासमोरही फ्लायओव्हरचे काम सुरू आहे.
भविष्याचे नियोजन
ठाणे-बेलापूर पट्ट्यात नव्याने उभ्या राहत असलेल्या व्यावसायिक संकुलांमुळे या मार्गावर वाहनांची संख्या वाढणार आहे. या मार्गावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने भविष्याचे नियोजन केले आहे. तीन उड्डाणपूल उभे राहिल्यानंतर या मार्गावरील प्रवास जलद होणार आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च एमआयडीसीने उचलावा यासाठी त्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.




























































