माजिवड्यात दुहेरी अपघात, ठाणेकर दीड तास ट्रॅफिक कोंडीत

भरधाव कंटेनरने जनरेटर व्हॅनला धडक दिल्याची घटना आज सकाळी माजिवडा ब्रिजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनरच्या धक्क्याने जनरेटर व्हॅन पुढे चालत असलेल्या घंटागाडीला जाऊन धडकली. सुदैवाने या दुहेरी अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ठाणेकरांसह नोकरीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले चाकरमानी दीड तास कोंडीत अडकले होते.

जनरेटर व्हॅनचालक अरमान शेख हा सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुर्ला येथून ठाणे येथे येत असताना माजिवडा ब्रिजजवळ भरधाव कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे रस्त्यावर ऑइल सांडले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, वाहतूक पोलीस, घनकचरा विभागाचे कर्मचारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. तसेच रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पथकांनी रस्त्यावर माती पसरवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान या अपघातामुळे नाशिककडून मुंबईच्या दिशेने वाहतूक दीड तास धिम्या गतीने सुरू होती.