
गादी व फोमचे उत्पादन करणाऱ्या वाड्यातील भगवान पुष्पदंत या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठा धमाका झाला. या दुर्घटनेनंतर मोठी आग लागून काही क्षणात ही कंपनी बेचिराख झाली. या आगीत अजय रावत (35) व राणी रावत (32) हे दोन कामगार होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. मात्र आग लागल्याचे समजताच अन्य कामगारांनी कंपनीबाहेर जीवाच्या आकांताने धाव घेतल्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
कोने येथे भगवान पुष्पदंत ही फोम उत्पादन करणारी कंपनी असून आज सकाळी साडेनऊ स्फोट झाला. या स्फोटामुळे मोठा भडका उडाला आणि बॉयलरजवळ काम करणारा अजय व त्याची पत्नी राणी हे दोघेही होरपळले गेले. भडक्यामुळे आग सर्वत्र पसरली आणि कामगारांची एकच पळापळ झाली. सर्व कामगारांनी कंपनीतून बाहेर पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल चार तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




























































