
मीरा-भाईंदरकरांना वेठीस धरणाऱ्या परिवहन कंत्राटदाराला पालिका आयुक्तांनी दणका दिला आहे. या ठेकेदाराला ठेका रद्द करण्याची नोटीस दिली असून 15 दिवसांत गाशा गुंडाळण्याचे आदेश दिले आहेत. ठेकेदाराने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून दुरुस्ती न केल्यामुळे 74 बसपैकी तब्बल 33 बसेस धूळ खात पडून आहेत. तर उर्वरित बसेसपैकी 37गाड्याही वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो.
मीरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या 74 डिझेल आणि 57 इलेक्ट्रिक अशा एकूण 131 बसेस आहेत. या बसेसचा ठेका मे. महालक्ष्मी सिटीबस ऑपरेटर (एसपीव्ही) एलएलपी या ठेकेदाराला देण्यात आला होता. मात्र गेल्या सात ते आठ महिन्यांपासून दुरुस्ती न केल्यामुळे 74 बसेसपैकी 33 बस बंद अवस्थेत आहे. तसेच यातील काही बसेस वारंवार रस्त्यातच बंद पडत आहेत. दररोज लाखो प्रवासी बसमधून प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना जास्तीचे भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांची संख्या कमी झाली असून उत्पन्नही घटले आहे. गाड्यांचे मेंटेनन्स होत नाही याप्रकरणी ठेकेदाराला आतापर्यंत महिन्याला लाखो रुपये दंड लावण्यात आला असून तो दंड त्याच्या बिलातून वसूल करण्यात आला आहे. आपला करार का रद्द करण्यात येऊ नये अशी शेवटची नोटीस ठेकेदाराला पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली आहे.


























































