
मित्र-मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तुला माझ्यासोबत राहावे लागेल नाहीतर कपडे फाडून तुझी धिंड काढेन, अशी धमकी नवी मुंबईतील भाजपचे पदाधिकारी बॉबी शेख यांचा मुलगा यश शेख याने दिली. या 17 वर्षीय मुलीच्या बर्थडे पार्टीत यश शेख जबरदस्तीने घुसला आणि त्याने मुलीला धमकावले. मुलीच्या मित्रांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी पीडितेने तक्रार करताच पोलिसांनी यश शेख यांच्या विरोधात पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांत तक्रार करू नका, अशी दमदाटी बॉबी शेख याने पार्टीत सहभागी झालेल्या मुला-मुलींना आणि त्यांच्या पालकांना केली. याबाबतची तक्रारही दाखल झाल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी त्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला आहे.
यश शेख याचे वडील बॉबी शेख हे नवी मुंबईतील भाजप अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी असून ते कोपरखैरणे येथे राहतात. यश शेख याने मागील काही दिवसांपासून वाशीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत वैयक्तिक परिचय वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु पीडित अल्पवयीन मुलीने त्याच्यासोबत मैत्री करण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र त्यानंतरदेखील यश शेख हा पीडित मुलीचा सतत पाठलाग करून तिला त्रास देत होता. 10 नोव्हेंबर रोजी ही मुलगी तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत वाढदिवसाची पार्टी करत असताना आरोपी यश शेख हा त्याच्या मित्रांसह जबरदस्तीने या पार्टीत घुसला आणि त्याने मुलीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुला माझ्यासोबत यावे लागेल नाहीतर तुझे कपडे फाडून धिंड काढेन अशी धमकी शेख याने दिली.
पार्टीत घुसखोरी करून यश शेख मोठमोठ्याने आरडाओरड करू लागल्यानंतर मुलीच्या मित्रांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. असे करू नको अशी विनंती केली. त्यानंतर शेख याने त्या मित्रांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली.यश शेखने धमकी देत मित्रांना मारहाण केल्यानंतर पीडित मुलीने वाशी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल दिली. या तक्रारीत यश शेखने केलेल्या छळवणुकीचा पाढाच तिने वाचला. त्यानंतर पोलिसांनी यश शेख याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बॉबी शेख यांच्यावरही गुन्हा
यशचे वडील बॉबी शेख यांनी पीडित मुलीच्या मारहाण झालेल्या मित्रांच्या पालकांना थेट फोन करून दमदाटी केली. पोलिसांत तक्रार करू नका अशा धमक्या दिल्या. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर बॉबी शेख यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































