
पालघर जिल्ह्यात सहावीतल्या मुलीला 100 उठाबश्या काढायला लावल्याने तिचा मृत्यू झाल्याप्रकरणी महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. सात दिवसानंतर अखेर शिक्षिका ममता यादव विरोधात गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे.
वालिव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेच्या सातीवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत घडली. शाळा प्रशासनाने निलंबित केलेल्या शिक्षिकेला भारतीय न्याय संहितेअंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 8 नोव्हेंबर रोजी शाळेत उशीरा पोहोचल्याने बारा वर्षीय आशिकाला पाठिवर दप्तर घेऊन तब्बल शंभर उठाबशा काढायला लावल्या होत्या. पण शाळेतून घरी परतल्यानंतर आशिकाची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला तातडीने वसईतील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती आणखीनच खालावल्याने तिला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तिचा मृत्यू झाला आहे.
तिच्या आईने आरोप केला आहे की, शिक्षिकेने अमानविय शिक्षा दिल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेवर धडक दिली होती. शाळा व्यवस्थापन व शिक्षकाच्या हलगर्जीपणामुळेच आशिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी काही पालकांनी शाळेला टाळे ठोकले. जोपर्यंत दोषी शिक्षकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही, असा इशारा दिला होता. आता त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.




























































