SIR कामाच्या ताणामुळे गुजरातमध्ये एका BLO ने जीवन संपवले; शैक्षणिक संघटनांमध्ये तीव्र संताप

मतदारयादी पुनर्निरीक्षणाच्या कामामुळे देशभरातील बूथ लेव्हल ऑफिसर्सवर (BLO) तणाव वाढत आहे. या SIR च्या कामाच्या ताणातून आणखी एक BLO ने आत्महत्या केली आहे. त्यामुळे आतापर्यंत आत्महत्या केलेल्या BLO ची संख्या 8 वर केली आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) च्या मृत्यूच्या घटनांमुळे चिंता निर्माण झाली आहे. मृताच्या कुटुंबियांनी या मृत्यूसाठी SIR च्या कामाला जबाबदार धरले आहे. मतदार यादींशी संबंधित कामांमुळे BLO वर प्रचंड दबाव होता, असे कुटुंबियांनी म्हटले आहे.

गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील कोडिनार तालुक्यातील चारा गावात बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) आणि एसआयआर म्हणून काम करणारे शिक्षक अरविंद वाढेर यांनी कामाच्या ताणामुळे आत्महत्या केली. या घटनेने शैक्षणिक संघटनांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ४० वर्षीय अरविंद वाढेर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या पत्नीला उद्देशून एक भावनिक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात म्हटले होते की, मी आता हे SIR चे काम करू शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून या कामामुळे मी थकलो आहे आणि तणावग्रस्त आहे. स्वतःची आणि माझ्या मुलाची काळजी घ्या. मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो, पण आता मी ताणतणाव असह्य होत आहे. माझ्याकडे पर्याय नाही. माझ्या बॅगेत सर्व SIR कागदपत्रे आहेत. ती शाळेत जमा करा. मला माझ्या प्रिय पत्नी संगीता आणि माझ्या प्रिय मुलाबद्दल खूप वाईट वाटते, असे त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

या घटनेनंतर, गुजरात प्रांतातील ऑल इंडिया नॅशनल एज्युकेशनल फेडरेशनने SIR अंतर्गत शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा करत आहे. अरविंद वाढेर यांच्या मृत्यूमुळे मतदार यादी दुरुस्ती प्रक्रियेत सहभागी असलेल्या बीएलओंना येणाऱ्या कामाच्या परिस्थिती आणि प्रचंड दबावाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. देशभरातील अनेक राज्यांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) च्या मृत्यूच्या मालिकेने गंभीर चिंता निर्माण केली आहे. SIR शी संबंधित दबावामुळे या आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गुजरातमधील खेडा येथे एका बीएलओचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, तर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे दुसऱ्याने आत्महत्या केली आहे. राजस्थानमध्ये दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सवाई माधोपूर येथील एका बीएलओचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि जयपूरमधील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने आत्महत्या केली. तामिळनाडूतील कुंभकोणम येथे कामाच्या ताणामुळे दबलेल्या एका वरिष्ठ अंगणवाडी बीएलओने गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. केरळमधील कन्नूर येथे, एसएसआरशी संबंधित ताणामुळे एका बीएलओने आत्महत्या केली. पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे एका बीएलओचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. त्यामुळे SIR चे काम, त्याचा ताण आणि त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.