
ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडकाम अर्ध्यावर लटकले आहे. रेल्वे मार्गिकेवर काम करण्यासाठी लोकल वाहतुकीचा ‘ब्लॉक’ देण्यास मध्य रेल्वे प्रशासनाने वेळकाढूपणा केला आहे. त्यामुळे मागील तीन आठवडय़ांपासून पुलाजवळ क्रेन वापराविना उभी असून महारेलच्या डोक्यावर क्रेनच्या लाखो रुपयांच्या भाडय़ाचा भार वाढत चालला आहे.
वरळी-शिवडी उन्नत मार्ग मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतून जात आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम तसेच डबलडेकर पुलाच्या बांधकामासाठी दोन्ही रेल्वे प्रशासनांची परवानगी आवश्यक होती. त्याबाबत ‘महारेल’ने केलेल्या पत्रव्यवहारानंतर दोन्ही प्रशासनांनी 78 ब्लॉक घेण्यास तयारी दर्शवली, मात्र त्या ब्लॉकचे दिवस निश्चित न केल्याने पुलाच्या लोखंडी सांगाडय़ाचे पाडकाम रखडले आहे.
रेल्वेने 78 ब्लॉक घेण्यास तयारी दर्शवल्यानंतर महारेलने पूर्व भागात 800 मेट्रिक टनच्या महाकाय क्रेन उभ्या केल्या. त्याला जवळपास तीन आठवडे उलटत आले आहेत. क्रेनचे दैनंदिन भाडे लाखाच्या घरात आहे. विनावापर उभ्या राहिलेल्या या क्रेनच्या भाडय़ापोटी ‘महारेल’ला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
रेल्वेच्या रात्रकालीन ब्लॉकचे तास वाढवून कमी दिवसांत काम पूर्ण करता येईल का? सलग 23 तासांचा ब्लॉक घेतला जाऊ शकतो का? यादृष्टीने वरिष्ठ अधिकाऱयांकडून चाचपणी केली जाणार आहे, असे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
पाडकामाशी संबंधित ‘वे लिव्ह चार्जेस’बाबत मध्य रेल्वेने अनुकूल भूमिका घेतली होती, तर पश्चिम रेल्वेने 59.14 कोटी रुपयांचे शुल्क मागून आडमुठी भूमिका घेतली होती. पश्चिम रेल्वेच्या अवाजवी रकमेमुळे पाडकाम रखडले होते.





























































