
नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होते. मात्र या कार्यक्रमाला विलंब झाल्यामुळे मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचे मी समर्थन करणार नाही. प्रशासनाला जागृत करण्यासाठी ठाकरे यांनी हे पाऊल उचलले. त्यामुळे त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा, असे स्पष्ट प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी आज येथे केले. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
नेरुळ येथील सेक्टर १ मधील चौकात नवी मुंबई महापालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे काम चार महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असले तरी पुतळ्याचे अनावरण झालेले नव्हते. पुतळा कापड आणि प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून ठेवण्यात आला होता. हा प्रकार अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रविवारी पुतळ्याचे अनावरण केले. याच पुतळ्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, माजी महापौर जयवंत सुतार, शहर अभियंता शिरीष आरदवाड आदी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली
नेरुळ येथील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मुख्य अतिथी म्हणून महापालिका प्रशासनाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले होते. मात्र शिंदे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या कल्याण तालुक्यातील १४ गावांना केलेला विरोध, दहिसर टोलनाका स्थलांतरणविरोधात घेतलेली भूमिका, ठाणे शहरात लावलेला जनता दरबाराचा धडका यामुळे शिंदे गट नाराज आहे. याच नाराजीतून एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.





























































