
भाजपला फायदा होईल अशा पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली. आता प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन करण्यात आले असून, त्यातही भाजपचेच हित बघण्यात आल्याने, हे मनपा प्रशासन आहे की, भाजपचे चाकर, अशी संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांमध्ये उमटली आहे. प्रभागांच्या सीमेवरील नावे शेजारच्या किंवा भलत्याच प्रभागात गेली असून, हा जवळपास दीड लाख मतांचा घोळ असल्याचे समोर येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मनपा प्रशासनाकडून प्रभागनिहाय निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली. मनपा प्रशासनाने भाजपची गुलामी करताना त्यांना फायदा होईल, अशीच प्रभाग रचना केली. आता मनपा प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली असून ती यादी पाहून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचे डोकेच गरगरले आहे. शहरात २९ प्रभाग असून, मतदार संख्या ११.१८ लाख आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका प्रभागात साधारण ३० ते ५० हजार मतदार असणे अपेक्षित आहे.
प्रभागाच्या सीमेवरील मतदार पळवले
प्रारूप मतदार याद्या पाहून मतदारांची मोठ्या प्रमाणावर पळवापळवी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याद्यांचे विभाजन करताना ते योग्य पद्धतीने करण्यात आले नाही. प्रत्येक प्रभागाच्या सीमेवरील साधारण चार ते पाच हजार मतदार भलत्याच प्रभागात घुसवण्यात आले आहेत. एकूण मतदारांपैकी किमान दीड लाख मतदारांची हेराफेरी झाल्याचा अंदाज आहे. मात्र, मनपा प्रशासनाने यावर मूग गिळले आहेत.
फोटो असलेल्या मतदार याद्या फोडल्याच नाही
मनपा प्रशासनाला प्राप्त झालेल्या मतदार याद्या फोटोसह असलेल्या होत्या. मात्र त्याची फोड करण्यासाठी दिलेल्या मतदार याद्या या फोटोसह असलेल्या मतदार याद्या नव्हत्या. अधिकाऱ्यांनी फोटो नसलेल्या साध्या नावांच्या याद्यांची फोड केली. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला आहे. वरिष्ठांच्या आदेशावरूनच या याद्या फोडण्याचे काम करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी
मनपा प्रशासनाची महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फायदा मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे. प्रभाग रचनेत हेराफेरी करून सत्ताधारी पक्षाला फायदा होईल, अशा प्रकारे प्रभाग रचना केली. एवढ्यावरच न थांबता मतदार याद्यांचे विभाजन करताना सत्ताधाऱ्यांना फायदा होईल, असे मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रभागात झाली हेराफेरी
मनपा निवडणुकीसाठी २९ प्रभाग असून, त्यापैकी प्रभाग १, २, ५, ८, ११, १५, १७, १९, २२, २३, २६, २८ या प्रभागांत मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचा आरोप इच्छुकांनी केला आहे. मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने आक्षेप घेण्यास अडचण येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
फुलंब्री मतदारसंघातील प्रभाग २४ मध्ये अपेक्षित मतदार प्रभाग २६ मध्ये गेले आहेत. मतदारांची ही संख्या १४०० एवढी आहे. विशेष म्हणजे माझे स्वतःचे नावदेखील २६ प्रभागाच्या मतदार यादीत गेले आहे.
भाऊसाहेब जगताप, माजी गटनेता, काँग्रेस






























































