निमित्त – पुण्यातील शापित पूल

>> नवनाथ शिंदे

पुण्यातील नवले पुलावर सातत्याने होणाऱया अपघातांमुळे ‘शापीत पूल’ ठरला आहे. 13 नोव्हेंबर रोजी येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत आठ निरपराधांचा होरपळून मृत्यू झाला. यानिमित्ताने नवले पुलाच्या स्थितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

शहरानजीक असलेल्या नवले पूल उभारणीत झालेल्या असंख्य तांत्रिक चुकांची भरपाई आता सर्वसामान्य नागरिकांना अपघातांच्या रुपात करावी लागत आहे. दर पंधरवडय़ात छोटय़ा अपघातापासून ते मोठय़ा अपघातापर्यंत सामान्य नागरीक मृत्यूच्या जबडय़ात सापडत आहेत. अपघातानंतर प्रशासनासह शासनाकडून केल्या जाणाऱया तोकडय़ा उपाययोजना वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांच्या मरणाला थोडी आडकाठी निर्माण करीत आहेत. मात्र, पूल उभारणीत झालेली तांत्रिक चूक दुरुस्त करण्यासाठी कायमस्वरूपी अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रत्यक्षात यंत्रणांकडून नाममात्र बदल होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आजचे मरण उद्यावर ढकलले जात आहे.

पुण्यातील सर्वाधिक मोठे उपनगर हे नवले पूल परिसरात वसले आहे. खेड-शिवापूर ते वारजे-माळवाडी असा संपूर्ण पट्टा राज्यातील कानाकोपऱयातून आलेल्या चाकरमान्यांनी व्यापला आहे. त्यात हा पूल आता शहरालगतच चिटकून असल्यामुळे दर दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हजारो नागरिकांची दुचाकीवरून वर्दळ असते. त्यातच महामार्गावरून घराकडे जाणाऱया अनेकांना जागोजागी छोटे रस्ते देण्यात आले आहेत. दरम्यान, कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिजदरम्यान आठ किलोमीटरचा उतार आहे. त्या उतारावर इंधन बचतीसाठी अवजड वाहन चालकांकडून हमखास वाहने न्यूट्रल केली जातात.  त्यातच महामार्गाच्या आजूबाजूला स्थानिक रहिवाशांना बाहेर निघण्यासाठी अनेक रस्ते ठेवले आहेत. त्यामुळे अचानक दुचाकीस्वार किंवा मोटार चालक  महामार्गावर आल्यामुळे अवजड वाहन चालकांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. तसेच अवजड वाहन न्यूट्रलवर असल्यामुळे त्याचा तातडीने ब्रेक लागत नाही आणि हमखास अपघात घडतात.

नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत  नसून सर्वसामान्यांना दर दिवशी जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्महावे लागत आहे. प्रत्येक अपघातानंतर एनएचआय, महापालिका, पोलीस, आरटीओ, वाहतूक विभागाला जाग येते. त्यानंतर दोन-चार दिवस तकलादू उपाययोजना राबवून वेळ निभावून नेली जाते. दूरगामी आवश्यक उपाययोजनांची टाळाटाळ होत आहेत. त्यामुळे वाहन चालकांचे जीवन धोक्यात आले आहे. पुन्हा मुंबई-बंगळुरू महामार्गाची वाट नवले पुलावरून जाते. दरदिवशी हजारो अवजड वाहने मुंबईहून सातारा आणि कोल्हापूर तसेच सातारा, सांगली परिसरातून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होतात. याच उतारावर वाहन चालकांचे सुटणारे नियंत्रण, ब्रेक फेल होण्याच्या घटनांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.  राज्यकर्त्यांनी पुलावर होणाऱया अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य नियोजनाला गती देत तातडीच्या आणि दूरगामी उपाययोजना राबवणे महत्त्वाचे आहे.

पाच वर्षांत 115 जणांचा मृत्यू

अपघातांचा शापित पूल अशी चर्चा असलेल्या नवले पूल परिसरात परिसरात मागील पाच वर्षांत तब्बल 95 गंभीर अपघात झाले आहेत.  संबंधित  अपघातांत 115 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद वाहतूक विभागाकडे आहे. अपघातांत 94 जण जखमी झाले  असून प्राणांतिक, गंभीर, किरकोळ असे एकूण मिळून 257 अपघात झाले आहेत.  नवले पुलानजीक होणाऱया अपघातांमुळे प्रशासन, शासन अन् नागरिक हतबल झाले आहेत. तीव्र उतार, वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन, आरटीओ नियमांचे उल्लंघन, मुदतबाह्य अवजड वाहनांद्वारे होणारी वाहतूक, बेशिस्त वाहन चालक अपघातास कारणीभूत असल्याचे  तपासात उघडकीस आले आहे. आता पुलावरील अवजड वाहनांची वेग मर्यादा 30 किलोमीटर प्रतितास एवढी केली आहे. त्यासाठी जागोजागी कारवाईसाठी स्पीडगन उभारण्यात आल्या आहेत. तसेच खेड, शिवापूर परिसरात पोलीस आणि आरटीओ विभागाचे संयुक्त चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे.

नवले पूल परिसरातील अपघात

वर्ष      अपघात    मृत्युमुखी संख्या

2021     21             28

2022     25             27

2023     22             31

2024     18             20

2025      9               9

(ऑक्टोबरअखेर)