
>> शुभांगी बागडे, [email protected]
शालेय अभ्यासक्रम हा भविष्यातील कोणत्याही शिक्षणाचा पाया. हा पाया अधिकाधिक मजबूत आणि सर्वंकष असणे आवश्यक; परंतु हा पाया डळमळीत राहावा यासाठीच प्रयत्न होत असावेत, अशी शंका उपस्थित करणारी सध्याची स्थिती आहे. नकाशांमधील चुका ही स्थिती अधिक गडदपणे समोर आणतात.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर लगेच काही दिवसांत जशा पेपरफुटीच्या, कॉपी पकडल्याच्या घटना कानावर पडू लागतात, त्याचप्रमाणे शालेय वर्ष सुरू झाले, अभ्यासक्रम जाहीर झाला अथवा नवीन पुस्तक, विषय यादीत अंतर्भूत झाला की त्यातील चुका, चुकीची छपाई, पाने गहाळ होणे, संवेदनशील मथळा, मजकूर या बातम्या येऊ लागतात. या घटनांची, चुकांची वारंवारता लक्षात घेता मुलांच्या शालेय अभ्यासाबाबत, पाठय़पुस्तकांबाबत, त्यातील तंत्रज्ञानाबाबत कोणतेही गांभीर्य उरले नसल्याची खात्रीच पटू लागते.
शालेय पाठय़पुस्तकांमधील अभ्यासक्रम काय असावा, त्याचे निकष कोणते, गुणवत्ता कशी राखली जावी, विषयाची सर्वांगीण व सैद्धांतिक माहिती याचा अभ्यास करणारी आणि त्या अनुषंगाने पाठय़पुस्तकाचा, विषयाचा मसुदा तयार करणारी विशेष समिती नेमलेली असते. राज्य शिक्षण मंडळाने नेमलेल्या या समितीतील सदस्य हे त्या त्या विषयातील तज्ञ असतात किंवा अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही; परंतु गेल्या काही वर्षांत पाठय़पुस्तक निर्मिती, अभ्यासक्रम यात सातत्याने होणाऱ्या चुका मात्र याबाबत शंका उपस्थित करण्यास वाव देतात. परीक्षेत विज्ञान आणि गणित या विषयांत नेहमी चुकीचा प्रश्न विचारून गुण वाढवण्याची विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. त्याप्रमाणेच शालेय अभ्यासक्रमात इतिहास आणि भूगोल या विषयांच्या पुस्तकात चुकीची माहिती, चुकीची छपाई हा गोंधळ दिसून येतो. इतिहास हा विषय तर कायमच सगळ्यांच्या रडारवर. चुकीच्या घटना, त्यांच्या तारखा, सनावळय़ा ते अगदी राजघराण्यांचे क्रम बदलणे इथपर्यंत चुका दिसून येतात. त्याहीपलीकडे जात भूगोलाच्या पुस्तकात भारताचा नकाशाच बदलला जावा या हेतूनेच केलेल्या चुका दिसून येतात.
भारताचा नकाशा बदलणे यासारखी गंभीर चूक नसावी आणि या चुका केवळ त्या क्षेत्रातील तज्ञच ओळखू शकतात. भूगोल विषय तज्ञ विद्याधर अमृते यांनी अशा अनेक चुका समोर आणल्या आहेत. या चुका दुरुस्त व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न ते करत असतात. मागील काही वर्षांत त्यांनी भूगोलाच्या पाठय़पुस्तकातील अनेक महत्त्वाच्या चुकांची यादी तयार केली आहे. या चुका संबंधित विभागाच्या संचालकांच्या निदर्शनास आणून देण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. मात्र यातील काही चुकांची अद्याप दुरुस्ती झाली नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
बालभारतीने 2018मध्ये दहावीच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल केले. मात्र या प्रयत्नांत अनेक गंभीर चुकांचीही छपाई झाली. भूगोलाच्या पुस्तकातील या काही चुका विद्यार्थ्यांना चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या ठरतील, असे मत तज्ञ व्यक्त करतात. 2018 पासून यातील काही चुकांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. विद्यार्थ्यांना भूगोलाच्या पुस्तकातून विविध देशांची तुलना करणारा भूगोल शिकविला जात असेल तर तशा स्वरूपाच्या नकाशांचा अंतर्भाव पाठय़पुस्तकात असणे गरजेचे आहे. मात्र तशी कोणतीच तरतूद तिथे दिसत नाही. मुळात आपल्या देशाचा पूर्ण भूगोल माहिती झाल्यानंतरच जगातील इतर देशांच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे सुलभ ठरते, असे मत भूगोल विषय तज्ञ विद्याधर अमृते यांनी व्यक्त केले. तसेच भूगोल शिकताना आवश्यक असलेला देशातील पिकांचा नकाशा, उद्योगांचा नकाशा पुस्तकातून योग्यरीत्या देण्यात येत नाहीत. विद्यार्थ्यांना आपल्या देशात कोणत्या भागात कोणती पिके पिकतात, कोणते उद्योग आहेत याचे ज्ञानच विद्यार्थ्यांना होणार नसेल तर हा विषय किंवा अगदी शेती या विषयाचेही परिपूर्ण ज्ञान प्राप्त होणार नाही असे ते म्हणतात.
इयत्ता दहावीच्या या पाठय़पुस्तकात भारताचा नकाशा तिरक्या दिशेने वाढवून देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण नकाशाच दृष्टीस पडताच वेगळाच दिसतो. पुढील पानांवर ब्राझीलमधील पावसाचा चुकीचा नकाशा, अॅमेझॉनच्या खोऱ्यात होणारी पावसाची नोंद पाठय़पुस्तकात चुकीची, देशातील हरित पट्टय़ांची तुलना करणाऱ्या नकाशामधील चुका जसे – आसाम, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांच्या भागाचा सदाहरित वनांमध्ये समावेश, देशातील चार महानगरांमधील पावसाची तुलना करणाऱ्या चार आलेखांत चुका… अशा अनेक चुकांबाबत विद्याधर अमृते आजही पाठपुरावा करीत आहेत.
याबाबत काही सोपे उपाय करणे शिक्षण प्रशासनाला अगदीच शक्य आहे. जसे की दिशेचा गोंधळ, राज्यांची चुकीची सीमा किंवा देशांची चुकीची तुलना. या चुकांमुळे विद्यार्थ्यांना भूगोलाचा चुकीचा अभ्यास होऊ शकतो, यावर उपाय म्हणून, अचूक नकाशांसाठी भूगोलाच्या पुस्तकात क्यूआर कोड सारखी पद्धत वापरून त्याद्वारे अचूक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करता येतील.

























































