तुमच्या हातात मत द्यायचं आहे पण निधी देणे माझ्या हातात आहे! अजितदादांचा मतदारांना दम

तुमच्या हातात मत द्यायचे आहे, तर निधी द्यायचे माझ्या हातात आहे, असा दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना दिला आहे. माळेगाव नगर पंचायतीचे अठराच्या अठरा उमेदवार निवडून द्या, तुम्ही सांगितलेले सगळे द्यायला मी तयार आहे, असेही ते म्हणाले.

बारामती तालुक्यातील माळेगाव नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जाहीर धमकी दिली. अजित पवार म्हणाले, माळेगाव नगर पंचायत माझ्या विचारांची नसेल तर माझे फारसे अडणार नाही, पण माझ्या विचारांचे लोक असतील तर निधी कसा वापरायचा हे मला सांगता येईल. यासाठी आम्ही ज्या 18 लोकांचे पॅनल उभे केले आहे, त्यांना तुम्ही निवडून द्या. तुम्ही मला मतदान करा आणि मी तुम्हाला विकासाची कामे करून देतो. मी जिह्याचा पालकमंत्री असून 1400 कोटी रुपयांचा निधी माझ्याकडे आहे. त्यामुळे संपुचित विचार मनात ठेवू नका, मन मोठं करा आणि मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून द्या. पण तुम्ही काठ मारली, तर मी पण काठ मारणार. त्यामुळे तुमच्या हातात मत द्यायचे आहे तर निधी द्यायचे माझ्या हातात आहे.

मी वाढपी आहे

अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे, परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं, तसं वाढपी म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. माळेगाव नगर पंचायतीच्या विकासासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी आणण्याची क्षमता केवळ आपल्याकडेच आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

कितीही वर्षे घासली तरी विकास होऊ शकत नाही

माळेगावकरांनो, तुमचं बजेट फक्त पाच-सहा कोटींचे आहे. त्यात तुम्ही कितीही वर्षे घासली तरी विकास होऊ शकत नाही. बारामतीचा विकास जसा हजारो कोटी आणून झाला आहे, तीच गोष्ट माळेगावला करायची आहे. त्यामुळे तुम्ही बघा काय करायचे ते, असा सल्लावजा इशारा पवार यांनी दिला.