
लोकल ट्रेनच्या प्रवासात अनेक प्रवासी लगेच डुलकी घेतात. अनेकदा इच्छित रेल्वे स्थानकातून ट्रेन गेल्यानंतर त्यांची झोप उडते. घाईने ट्रेनमधून उतरणारे प्रवासी ‘लगेज रॅक’वर ठेवलेली बॅग विसरतात. कित्येक प्रवासी मोबाईलमध्ये गुंतून राहत असल्याने त्यांची बॅग ट्रेनमध्ये राहते. दररोज ‘विसरभोळय़ा’ लोकल प्रवाशांच्या शेकडो बॅगा सुरक्षित ठेवण्याच्या अतिरिक्त कामाचा ताण रेल्वे स्थानकांतील कर्मचाऱयांवर येत आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील स्टेशन मास्तर कार्यालयात दररोज प्रवाशांच्या शेकडो बॅगा जमा होत आहे. एकटय़ा चर्चगेट स्थानकात रोज 10 ते 15 बॅगा जमा होतात. अनेक बॅगांमध्ये रोख रकमेसह अन्य मौल्यवान वस्तू असतात. त्यामुळे संबंधित प्रवासी येईपर्यंत बॅगेतील सर्व वस्तू सुरक्षित ठेवण्याची अतिरिक्त जबाबदारी रेल्वे कर्मचाऱयांवर येत आहे.
ग्रॅण्ट रोड स्थानकात प्रवाशांच्या बॅगांचा खच
ग्रॅण्ट रोड रेल्वे स्थानकात हरवलेल्या वस्तूंचे विशेष कार्यालय आहे. या ठिकाणी चर्चगेटपासून डहाणूपर्यंतच्या सर्व स्थानकांत सापडलेल्या प्रवाशांच्या वस्तू जमा केल्या जातात. लोकल ट्रेनमध्ये सापडलेली बॅग वा अन्य कोणतीही वस्तू एक-दोन दिवस स्टेशन मास्तर कार्यालयात ठेवण्यात येते. तेथे सात दिवसांत कोणीही दावा केला नाही तर ती वस्तू वा बॅग ग्रॅण्ट रोड स्थानकातील कार्यालयात जमा केली जाते. या स्थानकात हरवलेल्या-सापडलेल्या वस्तूंचा खच साचला आहे.
























































