
राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. तेथील हवेची श्रेणी धोकादायक स्थितीत असल्याने तेथील ग्रेपच्या नियमात बदल करण्यात आले आहे. आता दिल्लीनंतर राजस्थानातही प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. राजस्थानातील सिकरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे २४ जणांना श्वसनाच्या त्रासाने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राजस्थानमधील सिकरमधील प्रदूषित हवेमुळे अनेक लोक आजारी पडले आहेत. औद्योगिक क्षेत्र आणि बस डेपोजवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह दोन डझनहून अधिक लोकांना श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने एसके रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
रविवारी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील प्रदूषणाची स्थिती अचानक बिकट झाली आणि शहरातील औद्योगिक क्षेत्र आणि बस डेपोभोवती विषारी हवेमुळे सुमारे दोन डझन लोक आजारी पडले. आजारी पडलेले रुग्ण शहराच्या औद्योगिक क्षेत्र आणि बस डेपोजवळ राहतात. गेल्या काही दिवसांपासून या भागात प्रदूषित हवेमुळे सतत दुर्गंधी आणि धुके पसरत आहे.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, सकाळी अचानक हवेतील प्रदूषण वाढले. त्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागले. जवळच्या LBS शाळेतील मुलांनीही श्वास घेण्यास त्रास आणि डोळ्यांना जळजळ होत असल्याची तक्रार केली. स्थानिक रहिवासी म्हणतात की प्रदूषणामुळे त्यांचे दैनंदिन जीवन कठीण होत आहे, परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.
रुग्णालय प्रशासनाच्या मते, दाखल केलेले सर्व रुग्ण सध्या स्थिर आहेत आणि निरीक्षणाखाली आहेत. डॉक्टरांच्या प्राथमिक चाचण्यांमध्ये वायू प्रदूषणामुळे अॅलर्जी आणि श्वसनाच्या समस्या असल्याचा संशय आहे.



























































