दिल्ली डायरी – मायावती-ओवेसी संभाव्य आघाडीचा अन्वयार्थ

>> नीलेश कुलकर्णी , [email protected]

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ठाकूरवादाने उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला अनुकूल वातावरण आहे, असे चित्र निर्माण झालेले असतानाच बहेनजी मायावती यांनी एमआयएम पार्टीचे ओवेसी यांच्याकडे युतीचा प्रस्ताव दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ओवेसींची ताकद त्या राज्यात मर्यादित असली तरी मायावतींच्या दलितमुस्लिम फॉर्म्युल्याने कामफत्तेकेले तर समाजवादी पार्टीसकट काँग्रेसची वाट बिकट होणार आहे.

बिहार जिंकल्यानंतर भाजप आता अजून दीडेक वर्ष अवधी असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक तयारीला लागला आहे. बिहारच्या तुलनेत उत्तर प्रदेशचा पेपर भाजपसाठी काहीसा अवघड आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. योगींनी भाजपचा जनाधार असलेल्या ब्राह्मण, ओबीसी, मायक्रो ओबीसी व काही उपेक्षित जातींची सातत्याने उपेक्षा व अवहेलना करत फक्त ‘ठाकूरवादा’चे राजकारण केल्यामुळे त्या राज्यात भाजपची अग्निपरीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची उत्तर प्रदेशात दाणादाण उडाली त्यामागेही हाच ठाकूरवाद कारणीभूत होता.

मायावती – ओवेसी यांच्या संभाव्य युतीमागे भाजप आहे, अशी टीका आता काँग्रेस व समाजवादी पार्टीचे नेते करत आहेत. मायावती व ओवेसी यांच्यातले साम्य स्थळ म्हणजे दोघांनाही भाजपची ‘बी टीम’ म्हणून ओळखले जाते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला या दोघांचीही गरज आहे हेही खरे. मात्र केवळ भाजपधार्जिणे असे आरोप करून काही प्रश्न सुटणार नाहीत. दलित व मुस्लिम मतदानामध्ये मोठी फाटाफूट झाली तर त्याची जबरी किंमत समाजवादी व काँग्रेसला मोजावी लागेल. बिहारचे उदाहरण त्यासाठी बोलके आहे. मुस्लिम-यादव (मायी) समीकरण मजबूत आहे आणि ती आपली हक्काची पेढीच आहे, अशा आविर्भावात तेजस्वी यादव वावरत होते. मात्र, या समीकरणाला ओवेसी यांनी कशी कात्री लावली, हे तेजस्वी यांच्या लक्षातदेखील आले नाही. बिहारमध्ये ओवेसींनी 28 जागा लढविल्या. त्यापैकी ओवेसी लढत असलेल्या वीस जागांवर भाजपचा उमेदवार निवडून आला तर ओवेसींनी पाच जागा जिंकल्या. ओवेसींच्या पक्षाला तब्बल नऊ लाख मते मिळाली. सीमांचलच्या पट्टय़ात ओवेसी यांनी ज्या पद्धतीने मते खेचली त्या वेगाने तेजस्वी व काँग्रेसची आघाडी पराभवाच्या खाईत जाऊन पडली. त्यामुळे मायावती व ओवेसी यांना हिणवणे, भाजपची टीम बी म्हणणे सोपे. मात्र, त्यांच्यामुळे होणारी मतांची फाटाफूट कशी टाळावी, यासाठी समाजवादी पार्टी व काँग्रेसने आतापासूनच तयारीला लागणे गरजेचे आहे. बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशातही ‘मायी’ समीकरण मजबूत आहे. मात्र, त्यातील मुस्लिम फॅक्टर बाजूला झाला तर समाजवादी पार्टीला मोठा फटका बसेल. मायावतींनी यापूर्वी ब्राह्मण-दलित फॉर्म्युला ‘ब्राह्मण शंख बजायेगा, हाथी आगे जायेगा’, अशी घोषणा देत सुपरहिट केला होता. त्या जोरावर ऐतिहासिक विजय मायावतींनी मिळवला होता. आता मायावतींची तेवढी ताकद राहिली नसली तरी काँग्रेस व समाजवादी पार्टीला धक्का देण्याएवढी ताकद मायावती – ओवेसी आघाडीमध्ये आहे हे लक्षात घ्यायला हवे.

तेजस्वींना घाई कसली?

बिहारच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर लालूप्रसाद यादवांच्या कुटुंबातही ‘यादवी’ माजलेली आहे. या यादवीची भनक लागल्यामुळेच की काय, तेजस्वी यादव यांनी नवनिर्वाचित 25 आमदारांची बैठक बोलावून राष्ट्रीय जनता दलाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी स्वतःची निवड करून घेतली. पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, खरे कारण वेगळेच आहे हे नंतर पुढे आले. बिहारमध्ये विधानसभा गठित होण्याअगोदरच तेजस्वी यांनी पक्षाची बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चेला उधाण आले. तेजप्रताप व रोहिणी आचार्य या आपल्या भावंडांनी बंड करून कुटुंबाबाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेजस्वी यांच्या आणखी दोन बहिणींनी लालू परिवार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीयदृष्टय़ा अडचणीत असलेले तेजस्वी आता कौटुंबिकदृष्टय़ाही अडचणीत सापडले आहेत. पंचवीस आमदारांच्या भरवशावर विरोधी पक्षनेतेपद मिळेल, असा तेजस्वी यांना विश्वास आहे. नवनिर्वाचित आमदार नितीश कुमार किंवा भाजपकडे जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय जनता दलाचे बहुतांश आमदार शपथ घेतल्यानंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच आपल्या नेतेपदाचा खुंटा बळकट करण्यासाठी तेजस्वी यांनी ही बैठक बोलावल्याचे उघड झाले आहे. एकेकाळी विरोधी पक्षांचे आमदारदेखील ज्यांच्या ‘दहशती’खाली राहायचे त्या लालू यादवांच्या पक्षाचे स्वतःचेच आमदार राहतील की जातील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. कालाय तस्मै नम!

शॉटगनकाय करणार?

बिहारी बाबू शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांची तोफ सध्या ‘खामोश मोड’मध्ये आहे. शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसचे आसनसोलचे खासदार आहेत. मात्र, सध्या ते फारसे चर्चेत नसतात. बिहार या आपल्या राज्यातील निवडणुकीतही ते फारसे सक्रिय दिसले नाहीत. वय हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहेच. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारमधील कुमरहार या एकमेव जागेसाठी प्रचार केला तो प्रशांत किशोर यांनी उमेदवारी दिलेल्या के.सी. सिन्हा यांचा. सिन्हा हे बिहारमधले गणिताचे नामांकित शिक्षक आहेत. त्यांची गणिताची पुस्तके अनेक पिढय़ांनी अभ्यासली आहेत. अशा सिन्हा गुरुजींच्या प्रचाराला दुसरे सिन्हा बंगालातून धावून आले तरी गुरुजी काही निवडणूक जिंकले नाहीत. बिहारच्या निकालानंतर मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी इतरांना ‘खामोश’ म्हणत आपले मौन सोडले आहे. बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सिन्हा यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. ‘‘नितीश कुमारांच्या योजनांमुळे व प्रामाणिकपणामुळे बिहार विकासाच्या प्रगतीपथावर आहे’’, अशा शब्दांत सिन्हा यांनी नितीशबाबूंना शाबासकीची थाप दिली आहे. ‘‘बिहारच्या जनतेला जसे हवे होते तसेच सरकार मिळाले’’, अशा शब्दांत त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हांच्या या शुभेच्छांमुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. सिन्हा पुन्हा बिहारच्या राजकारणात सक्रिय होतील काय? याबाबत चर्चा होत आहेत. बंगालच्या निवडणुकीत ते सक्रिय राहणार की नाही? याबद्दलही प्रश्न विचारले जात आहेत. भाजप नेतृत्वावर नाराज होऊन सिन्हा यांनी ममतादीदींच्या पक्षात प्रवेश केला होता. मात्र आता त्यांचे मन बंगालात रमत नसल्याचे दिसून येत आहे. बघू या, शॉटगन पुढे काय करतात ते!