
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याबद्दल एका डॉक्टरवर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. हरियाणा येथील ही घटना आहे.
कोरोना महामारीच्या काळात डॉ. मनोज हे सरकारी रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये कर्तव्यावर होते आणि यावेळी एका आमदाराने या रुग्णालयाला भेट दिली होती. डॉक्टर मनोज यांनी त्यांना पाहिल्यानंतरही ते उभे राहिले नाहीत यावरून आमदार चिडले होते आणि त्यांनी मनोज यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. मनोज यांनी त्यांचे उत्तर जून 2024 मध्ये दाखल केले, ज्यामध्ये त्यांनी आपण आमदारांना ओळखले नाही त्यामुळे अजाणतेपणाने आपण उभे राहिलो नाही असे स्पष्ट केले. पण यासंबंधीचा निर्णय आजपर्यंत देण्यात आला नाही.
न्यायालयाचे म्हणणे
या घटनेवर आश्चर्य व्यक्त करत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा राज्य सरकारला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला त्या डॉक्टरला अडवून ठेवण्यात आलेले ना-हरकत प्रमाणपत्र तातडीने जारी करण्याचे निर्देशदेखील दिले आहेत.


























































