‘चाबूकफोड नेते’ बाळासाहेब कुलकर्णी यांचे निधन

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, ‘चाबूकफोड’ आंदोलनाचे प्रणेते बाळासाहेब ऊर्फ अरुण यशवंत कुलकर्णी (वय 87) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. 24) सकाळी नऊ वाजता अमरधाम स्मशानभूमी सांगली येथे होणार आहे.

बाळासाहेब कुलकर्णी यांनी चाबूकफोड आंदोलन, कलेक्टर कचेरीत भ्रष्टाचार बंद व्हावा म्हणून सत्यनारायण पूजा, वडाप गाडीवाल्यांसाठी कोंबडी-बाटली आंदोलन अशी बरीच आंदोलने केली. पक्षाघातामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.

तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील बाळासाहेब ऊर्फ अरुण यशवंत कुलकर्णी यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात 1990 साली तासगाव विधानसभा निवडणुकीने झाली. सांगली साखर कारखाना गैरकारभाराविरोधात आंदोलन केले. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभाग, ‘चाबूकफोड’ आंदोलन करून नोकरशाहीला घाम फोडला होता. माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात तासगावमधून शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगली जिल्हाप्रमुख, शेतकरी सेना महाराष्ट्रप्रमुख अशा जबाबदाऱयाही दिल्या होत्या.