गुजरातच्या भाविकांची बस उत्तराखंडमध्ये 70 फूट खोल दरीत कोसळली; 5 ठार, 23 गंभीर जखमी

गुजरातच्या भाविकांच्या बसला उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली बस (क्र. यूके 07 पीए 1769) टिहरी जिल्ह्यातील कुंजपुरीजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये 5 भाविकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिलेले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी जारी करण्यात आलेली नाही.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नरेंद्रनगर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या कुंजपुरी-हिंडोलाखाल जवळ भाविकांची बस 70 फूल खोल दरीत कोसळली. या बसमध्ये चालक-वाहकासह 30 ते 35 प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

बसमधून प्रवास करणारे काही प्रवासी गुजरात, तर काही दिल्लीचे असल्याची माहिती मिळतेय. पोलीस सध्या याची चौकशी करत असून अपघातानंतर घटनास्थळावरून काही लोक पसार झाले आहेत, अशी माहिती एएसपी जे. आर. जोशी यांनी दिली.

तमिळनाडूमध्ये दोन बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू