
हिंदुस्थानी नारी जगात लयभारी असल्याचा करिश्मा अवघ्या 23 दिवसांत तिसऱयांदा घडला. महिला कबड्डीच्या जागतिक रणांगणात हिंदुस्थानी सिंहिणींनी चिनी ड्रॅगनचा झंझावात रोखत पुन्हा एकदा जगज्जेतेपद होण्याचा पराक्रम केला. सलग दुसऱयांदा महिला कबड्डी वर्ल्ड कपमध्ये बाजी मारताना चिनी तैपेई संघाचा 35-28 असा पराभव केला.
13 वर्षांपूर्वी बिहारमध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या कबड्डी वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी महिलांनी कबड्डीच्या रणरागिनी असल्याचे दाखवून दिले होते. इराणचा पराभव करत हिंदुस्थानी महिला संघ जगज्जेता ठरला होता. मात्र यंदा इराणची कडवी झुंज उपांत्य फेरीतच मोडून काढल्यामुळे हिंदुस्थानसमोर चिनी तैपेईचे जबर आव्हान होते. पण कबड्डीचा दीर्घ अनुभव असलेल्या हिंदुस्थानी संघाने आपल्या कौशल्याच्या जोरावर तैपेईला जगज्जेतेपदापासून रोखले.
पहिल्या सत्रात तैपेईचा आवाज
सलग सहा विजयांसह अंतिम फेरीत धडक मारणाऱया चिनी तैपेईने आज हिंदुस्थानी संघाचा चांगलाच दम काढला. पहिल्या सत्रात तर त्यांच्या झुंजार खेळाने हिंदुस्थानला अक्षरशः पिछाडीवर टाकले होते. सुरुवातीला सोनाली शिंगटेच्या वेगवान चढायांनी हिंदुस्थानला 6-4 अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र तेव्हाच चिआओ वेन येनने जबरदस्त चढाई करत बोनस गुणासह मिळवलेल्या तीन गुणांना तैपईला अनपेक्षित बरोबरी साधून दिली आणि मग पूजाच्या केलेल्या पकडीने तैपेईला 9-7 अशी आघाडी मिळवून दिली. हिंदुस्थानी संघ पिछाडीवर गेला यावर पुणाचा विश्वासच बसत नव्हता. पहिल्या डावाच्या तेराव्या मिनिटापर्यंत तैपेईने आघाडी राखली.
13 वर्षांत 13 सामने अपराजित
2012 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी महिला संघाने विजयी षटकारासह जगज्जेतेपदाचा मान मिळवला होता. तर दुसऱया वर्ल्ड कपमध्येही हिंदुस्थाने आपल्या नॉनस्टॉप विजयांची मालिका कायम राखली. या स्पर्धेतही सलग सात सामने जिंकण्याचा विक्रम हिंदुस्थानी महिलांनी केला. त्यामुळे हिंदुस्थानी संघ सलग 13 सामने अपराजित राहिला आहे.
23 दिवसांत जगज्जेतेपदाची हॅटट्रिक
बरोबर 23 दिवसांपूर्वी म्हणजे 2 नोव्हेंबरला हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आयसीसी वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच काल अंध महिलांनी टी-20 क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला आणि आज कबड्डीच्या सिंहिणींनी चिनी ड्रॅगनला गिळत जगज्जेतेपदाची अनोखी हॅटट्रिक साजरी केली. या विजयामुळे हिंदुस्थानी महिलांनी क्रीडा विश्वात आपला दबदबा वाढत असल्याचे दाखवून दिले आहे.
संजू देवीसारखी धावली…
हिंदुस्थानी संघ पिछाडीवर होता. तीन गुणांची आघाडी तैपेईकडे होती. हिंदुस्थानच्या 3 खेळाडूच मैदानात होत्या. तैपेई लोण चढवण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा संजू देवीसारखी पावली. तिने केलेल्या खोल चढाईने हिंदुस्थानला एक-दोन नव्हे तर चार गुण मिळवून दिले आणि येथेच हिंदुस्थानी संघाचे मनोधैर्य उंचावले. मग पुढच्याच चढाईत संजूने उरलेल्या दोघींना एकाच चढाईत टिपत तैपेईवर लोणच चढवला नाही तर हिंदुस्थानची आघाडी 17-14 वर नेली. मध्यंतराला 20-16 अशी आघाडी होती. मग हिंदुस्थानने आक्रमक आणि चतुर खेळ करत तैपेईच्या चढाईपटूंना वारंवार जेरबंद करत त्यांना जगज्जेतेपदासमीप येऊच दिले नाही आणि हिंदुस्थानी महिलांनी 35-28 अशा फरकाने ड्रॅगनविरुद्धचे कबड्डी युद्ध जिंकले. आजच्या कामगिरीमुळे संजू देवी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.


























































