
कोलकातापाठोपाठ गुवाहाटीतही हिंदुस्थानी फलंदाजांनी माती खाल्ली. बरसापाराच्या ज्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने 489 धावांचा पाऊस पाडला, तेथे हिंदुस्थानी फलंदाजांना दोनशेपार जाणंसुद्धा इतपं कठीण झालं की त्यांचा दम निघाला. फलंदाजीत 93 धावांची षटकारबाजी करणारी खेळी करणाऱया मार्को यानसनने गोलंदाजीत सहा विकेट टिपत हिंदुस्थानी डावाला 201 धावांवरच पूर्णविराम लावला. आफ्रिकेने हिंदुस्थानवर फॉलोऑन लादला, पण त्यांना फलंदाजीला न बोलवता स्वतःच फलंदाजी केली आणि तिसऱया दिवसअखेर पहिल्या डावातील 288 धावांच्या प्रचंड आघाडीसह आपली आघाडी 314पर्यंत नेली. खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने बिनबाद 26 धावा केल्या होत्या आणि त्यांचा संघ हिंदुस्थानी भूमीवर पहिल्यावहिल्या कसोटी मालिका विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे.
कोलकात्यात जिंकता जिंकता हरल्याचे वळ पाठीवर दिसत असताना गुवाहाटीतही हिंदुस्थानी फलंदाजांनी तीच कामगिरी केली आहे. फलंदाजी करताना यानसनने उत्तुंग षटकार ठोकले होते आणि गोलंदाजी करताना त्याचे बाऊन्सर थेट छपरावरून येताहेत की काय असा भास होत होता. त्याने 6 विकेट टिपत हिंदुस्थानी मधली फळी अक्षरशः कापून काढली. यानसनच्या घणाघाताचे उत्तर काल हिंदुस्थानी गोलंदाजांकडे नव्हते. तसेच त्याच्या भेदक माऱयाचेही उत्तर फलंदाजांना सापडले नाही.
दुसऱया दिवसाच्या बिनबाद 9 धावांवरून हिंदुस्थानने खेळ पुढे नेला. जैसवाल आणि राहुलने 65 धावांची सावध सलामी दिली. पण ही सावधगिरी इतकीच की फिरकी जोडी महाराज आणि हार्मरला ‘वॉर्म-अप’ करण्याइतपत. महाराजने राहुलला मार्करमकडून झेलबाद केले आणि हार्मरने जैसवालला यानसनकडून पकडले. मग सुरू झाली हिंदुस्थानी संघाची पळापळ. हार्मरने आधी जैसवालला तर मग साई सुदर्शनला बाद करून हिंदुस्थानी संघाला हादरवले. पुढे यानसने ध्रुव जुरेल (0), ऋषभ पंत (7), नितीश रेड्डी (10) आणि रवींद्र जाडेजाची (6) यांची विकेट पाच षटकांत काढत हिंदुस्थानी 7 बाद 122 अशी केविलवाणी अवस्था केली.
पुन्हा सुंदर संघर्ष…
हिंदुस्थानची 43.3 षटकांत 7 बाद 122 अशी दुर्दशा झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर आणि पुलदीप यादव यांनी कसोटी क्रिकेटचा अस्सल खेळ दाखवला. दोघांनी मिळून 208 चेंडूंच्या संयमी खेळीत 72 धावा जोडत हिंदुस्थानच्या गुदरमलेल्या डावाला श्वास दिला. सुंदरने 48 धावा करत प्रतिकार केला तर 134 चेंडू खेळून पुलदीपने हिंदुस्थानी फलंदाजांची लाज काढली. ज्या पुलदीपला बॅटही धरता येत नाही, असे म्हटले जाते तोच पुलदीप तब्बल दोन तास संघर्ष करत होता. खऱया अर्थाने तोच लढला. पण यानसनने त्याला आणि बुमराला बाद करत 6 विकेट टिपले.
हिंदुस्थान विजयापासून मैलभर दूर
पहिल्या डावात 288 धावांच्या पिछाडीनंतर हिंदुस्थान कसोटीत पुनरामगन करील आणि गुवाहाटी कसोटी जिंकेल, हे आता अशक्य आहे. हिंदुस्थानने आफ्रिकेला शंभरीत गुंडाळून 400च्या आसपास असलेले विजयी लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करणे सध्या कठीण वाटतेय.




























































