रोनाल्डोची वयाच्या चाळिशीत बायसिकल किक!

जिद्द, फिटनेस आणि फुटबॉल वेडय़ा ख्रिस्तियानो रोनाल्डोने वयाच्या चाळिशीत बायसिकल किक मारून गोल करीत फुटबॉल खेळातील आपल्या महानतेला आणखी नव्या उंचीवर नेले. अल नसर क्लबकडून खेळताना रोनाल्डोने अल-खलीजविरुद्ध सामन्याच्या अखेरच्या क्षणी बायसिकल किक मारून सामना संस्मरणीय केला.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेरीच्या मिनिटाला केलेला हा गोल म्हणजे केवळ गोल नव्हता, तर भावना, क्लास आणि ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम दर्जाचा ‘सिग्नेचर मोमेंट’ होता. ही बायसिकल किक पाहताच चाहत्यांना 2017 मध्ये युव्हेंटसविरुद्ध रोनाल्डोने केलेल्या सर्वकालीन सर्वोत्तम गोलची झटपट आठवण झाली. हा रोनाल्डोच्या कारकिर्दीतील 954वा गोल ठरला. आणि ‘वय हा फक्त अंक असतो’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दिग्गजांची भूक ही कायम तरुण राहत असते, हे रोनाल्डोच्या या बायसिकल किकने पुन्हा एकदा अधोरेखीत केले.