
तळोजा करवले गावाजवळ होणाऱ्या पालिकेच्या प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड प्रकल्पासाठी खासगी जमीन मालकासोबत होणारा 200 कोटींचा जमीन खरेदीचा व्यवहार परवडत नसल्याने पालिकेने थेट प्रकल्प रद्द केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेचा हा प्रकल्प आता लटकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना करीत असताना तळोजा येथे भलेमोठे डंपिंग ग्राऊंड तयार करणे प्रस्तावित होते. यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे 52 हेक्टर जमीन मागितली होती. यापैकी 40 हेक्टर जमीन राज्य सरकारने पालिकेला दिली देखील होती. उर्वरित जमीन 2019 मध्ये पालिकेला हस्तांतरित करण्यात येणार होती. मात्र या जागेवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाल्याने पालिकेला प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही. खासगी जमिनीबाबत तोडगा निघाला नसल्याने अखेर पालिकेने हा व्यवहारच न करण्याचा निर्णय घेतला. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या या प्रस्तावाला पालिका आयुक्त प्रशासकांनी मंजुरी दिल्याचे समजते.
मिळालेली जमीन पालिका संरक्षित करणार
दरम्यान, राज्य सरकारकडून मिळालेली जमीन पालिका संरक्षित करणार आहे. या 40 एकर जमिनीतील काही भाग अलिबाग कॉरिडोरसाठीदेखील गेला आहे. तर उर्वरित जमीन आता पालिका संरक्षित करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या ठिकाणी कचरा वाहून नेण्यास व्यवहार्य नसल्याचे कारण पालिकेने आता पुढे केले आहे.

























































