
मागील अडीच वर्षांत बेस्ट उपक्रमातून सेवानिवृत्त झालेल्या 6 हजारांहून अधिक बेस्ट कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी तसेच इतर अंतिम देयके दिलेली नाहीत. या अन्यायाविरोधात आक्रमक झालेल्या निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांनी सोमवारी आझाद मैदानात लक्षवेधी धरणे आंदोलन केले. ‘बेस्ट प्रशासन हाय हाय’, ‘ग्रॅच्युईटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या आणि बेस्ट प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला.
बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीच्या वतीने लक्षवेधी धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठले आणि तेथूनच गळ्यात मागण्यांचे फलक घालून आझाद मैदानाच्या दिशेने कूच केली. आंदोलनात मोठ्या प्रमाणावर निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. अडीच वर्षांपासून रखडलेली ग्रॅच्युईटी, वेतन करारातील थकबाकी, कोविड भत्ता, दिवाळी बोनस, एलटीए, रजेचा पगार, पीएफवरील व्याज तसेच इतर देयकांच्या प्रश्नाकडे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. निवृत्त कर्मचाऱ्यांनी बेस्ट प्रशासनाच्या निषेधाचे फलक झळकावले. बेस्ट प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? भीक देता का आम्हाला? आमची स्वर्गवासी करण्याची तयारीच केली आहे का? असे संतप्त सवाल आंदोलकांनी केले. मंगळवारीही आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.
ग्रॅच्युईटीचे तब्बल 891 कोटी थकीत
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 एप्रिल 2022 रोजी निवृत्त झालेल्या सर्व बेस्ट कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व इतर देयके मे 2022मध्ये एका क्लिकवर दिली होती. मात्र महायुती सरकारने नोव्हेंबर 2022पासूनची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची विविध देयके प्रलंबित ठेवली आहेत. 1 ऑक्टोबर 2025पर्यंत निवृत्त झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीचे तब्बल 891.04 कोटी रुपये थकीत आहेत.
बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गेली अडीच वर्षे आपल्या न्याय्य हक्काच्या अंतिम देयकांसाठी बेस्ट उपक्रमाच्या दारी वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. कधी रेल्वे स्थानकात, कधी कुठल्या चौकात, तर कधी आझाद मैदानात आंदोलन करावे लागत आहे. आम्ही गुन्हेगार आहोत का? कष्टाच्या पैशांसाठी कोर्टात जायचे का? आम्ही मुंबईकरांची सेवा केली. हा मोठा गुन्हा केल्याप्रमाणे आम्हाला वागणूक मिळत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त कर्मचारी भास्कर तोरस्कर यांनी दिली.



























































