Breaking – इथोपियातील ज्वालामुखीमुळे मुंबई, दिल्ली विमानतळांवरील अनेक उड्डाणं रद्द, अलर्ट जारी

इथोपियातील ज्वालामुखीमधून निघणारी राख आता हिंदुस्थानसाठी डोकेदुखी ठरली आहे. हॅले गुब्बी या ज्वालामुखीमधून निघणारी राख आणि सल्फरचे कण हे हवेत आता पसरले असून याचा परीणाम विमान वाहतूकींवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळेच हिंदुस्थानातील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक, दिल्लीत पोहोचले विषारी ढग

ज्वालामुखीची ही राख विमानांसाठी धोकादायक असल्याने अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंजिनामध्ये बिघाड होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच वैमानिकांना समोर दिसणेही कठीण होते. याच कारणास्तव आता खबरदारीचा उपाय म्हणून विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

याचा सर्वाधिक परीणाम हा दिल्ली, राजस्थान आणि उत्तर हिंदुस्थानातील विमान सेवांवर झालेला आहे. राजधानी दिल्लीच्या अनेक भागात AQI ४०० पेक्षा जास्त झाला आहे आणि विषारी धुके पसरले आहे. आनंद विहार, एम्स आणि सफदरजंगच्या आसपास दृश्यमानता कमी झाली आहे. ज्वालामुखीच्या राखेमुळे, अकासा एअर, इंडिगो आणि अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे वळवण्यात आली आहेत, काही रद्दही करण्यात आल्या आहेत.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान कंपन्यांना इशारा जारी केला आहे. राख असलेले क्षेत्र आणि उंचावरील उड्डाणे टाळण्यास, मार्ग बदलण्यास आणि इंजिनची तपासणी करण्यास सांगितले आहे. याच परिस्थितीला अनुसरून, एअर इंडियाने अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे एअरलाइनचे म्हणणे आहे आणि त्यांनी हे पाऊल उचलले आहे.