मुंबईतील भुयारी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल

मुंबईतील मेट्रो 3 मध्ये तांत्रिक कारणामुळे वाहतुकीला विलंब झाला आहे. 10.25 मिनीटांनी मुंबई कफ परेड स्थानकावर ही मेट्रो बंद पडली आहे. पण सकाळी सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.

मंगळवारी सकाळी मेट्रो 3 कफ ही परेड स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली. याबाबत विलंब होत असल्याने मेट्रोमध्ये सतत सूचनाही देण्यात येत होत्या. तांत्रिक कारणामुळे होणाऱ्या विलंबाबाबत आम्ही दिलगीर आहोत. अशाप्रकारच्या सूचना मेट्रोमध्ये दाखवल्या जात आहेत. याबाबत आता मेट्रो 3 च्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

सिद्धिविनायक स्थानकावर एका गाडीत तांत्रिक अडचण आल्यामुळे ती गाडी अंदाजे 10 मिनिटे थांबली होती. संबंधित समस्या तत्काळ दूर करण्यात आली आहे. या कारणामुळे सध्या गाड्या सुमारे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. आमचे पथक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून सेवा लवकरच पूर्णपणे वेळापत्रक प्रमाणे सुरळीत होण्याची अपेक्षा असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले.