फेक अकाऊंटवाल्यांचा पर्दाफाश होणार! X ने लॉन्च केले नवे फिचर, Internet Activity मुळे समजणार देशाचे नाव

उद्योजक एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून ट्विटर (X) आणि एलॉन मस्क कायम चर्चेत आहेत. एलॉन मस्क नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असतात. हल्लीच त्यांनी एक नवे फिचर लॉन्च केले आहे. Pandora’s box असे याचे नाव आहे. यामध्ये X युजर्स कोणत्या देशाचे आहेत? याबाबत माहिती मिळणार आहे.

मागील आठवड्यात सुरू झालेल्या About this account या फीचरमुळे, युझरने त्यांच्या बायो किंवा प्रोफाईल माहितीत काहीही नमूद केले असले तरी, त्यांच्या इंटरनेट ॲक्टिव्हिटीच्या आधारावर त्यांचे देश आणि प्रदेशाचे स्थान आता अकाऊंटवर दिसणार आहे. तसेच, हे फीचर युझरने त्यांचे युझरनेम किती वेळा बदलले हे देखील दाखवते. एलॉन मस्क यांच्या या नव्या फिचरचा फायदा राजकीय, संरक्षण क्षेत्रासह इतरही क्षेत्रांना होणार आहे.

‘X’ च्या या नवीन फिचरचा सर्वात मोठा उपयोग राजकीय प्रचार आणि राजकारण्यांच्या खोट्या अकाऊंटवरून होणाऱ्या आंदोलनांचा तपास करण्यासाठी केला जात आहे. अलिकडेच  अमेरिकेत ‘MAGA’ (Make America Great Again) मोहिमेत सहभागी झालेले अनेक ‘अमेरिकन’ अकाऊंट प्रत्यक्षात परदेशी असल्याचे या फिचरमुळे आढळून आले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, X वर हिंदुस्थानातही असेच एक अकाऊंट दिसून आले आहे. राजकीय मत, प्रचार आणि दिशाभूल करणारे अनेक ‘X’ अकाऊंट पाकिस्तानातून चालवली जात असल्याचे समोर झाले आहे. X वरील हिंदू महिलेचा फोटो असलेले @chaturvediswati हे अकाऊंट त्यांच्या बायोमध्ये “जय हिंद” असे लिहिले आहे. या अकाऊंटवर हिंदुस्थानातील प्रत्येक देशांतर्गत राजकीय मुद्द्यावर मत मांडतात. लाल किल्ल्यावरील स्फोटापासून ते बिहार निवडणुकीपर्यंत केलेल्या त्यांच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. मात्र, X च्या नवीन फिचरनुसार हे आकाऊंट पाकिस्तानातील असल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, या नवीन फिचरमुळे अनेक फेक अकाऊंटचा पर्दाफाश होणार आहे. या नवीन फिचरला काही तांत्रिक मर्यादा आहेत. जे युझर्स वारंवार VPN सेवा वापरतात, त्यांच्या ‘X’ डेटाबेसमध्ये देशाची आणि प्रदेशाची माहिती चुकीची दिसू शकते. याबाबत X च्या अधिकृत अकाऊंटवर माहिती देण्यात आली आहे.