आजी ओरडली, बिबट्या पळाला, संकेत बचावला; कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे नऊ वर्षांचा चिमुरडा वाचला

थंडीचा कडाका असल्याने नऊ वर्षांचा चिमुकला संकेत पहाटे ६ वाजता अंगणात आला आणि शेकोटी पेटवू लागला. त्याला पाहताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुंपणावरून उडी मारून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण इतक्यात संकेतची आजी बाहेर आली. तिने जिवाच्या आकांताने ओरडाओरडा केला. या आकस्मिक आवाजाने बिबट्या भेदरला आणि पळून गेला. त्यामुळे चिमुकल्या संकेत भोयेचे प्राण बचावले आहे. ही घटना खोच ग्रामपंचायतीच्या
पिंपळपाडा गावात घडली.

गेल्या महिनाभरापासून मोखाडा तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांच्या घरातून कोंबड्या, बकऱ्या फस्त केल्या आहेत. अनेकांनी बिबट्या दिसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मोखाडा त्र्यंबकेश्वर मार्गावर एका दुचाकीस्वारावरही बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. ही घटना ताजी असतानाच खोच गावाजवळील पिंपळपाडा येथेही बिबट्याने शिकारीसाठी झेप घेतली.

वनक्षेत्रपाल घटनास्थळी
पिंपळपाडा गावात संकेत भोये (९) हा तिसरीत शिकणारा विद्यार्थी कुटुंबासह राहतो. पहाटे ६ वाजता तो उठला. थंडी वाजते म्हणून अंगणातील एका कोपऱ्यात शेकोटी पेटवायला तो बसला. कुंपणापलीकडे बिबट्या शिकारीच्या शोधात दबा धरून बसला होता. संकेतला पाहताच त्याने कुंपणावरून उडी मारली, परंतु इतक्यात अंगणात आलेल्या संकेतच्या आजीने जोरजोरात आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या तेथून पळाला. सुदैवाने संकेतला कोणतीही इजा झाली नाही असे संकेतचे काका केशव भोये यांनी सांगितले. वनक्षेत्रपाल विनोद दळवी यांनीही घटनास्थळाची पाहणी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.