
महत्त्वाच्या असलेल्या सूर्या पाणीपुरवठा योजनेतील सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापासून मीरा-भाईंदरकरांना धो-धो पाणी मिळेल. ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याचे टेन्शन संपणार आहे. त्यामुळे महिलावर्गाला मोठा दिलासा मिळणार असून पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबणार आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळण्याच्या दृष्टीने आतापासूनच जय्यत तयारी सुरू झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मीरा-भाईंदरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. मोठमोठे गृहप्रकल्प आल्याने शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत गेली. मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प हा वरदान ठरला असून येथील विजेचे पंप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा करणे गरजेचे होते. आतापर्यंत ही वीज मिळत नसल्याने पाणीपुरवठा करण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले.
मीरा-भाईंदरमधील पाण्याच्या समस्येबाबत आज परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूर्या पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती सांगितली. आता सूर्या प्रकल्पासाठी १३२ केव्ही उच्च दाबाचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास महापारेषणने तांत्रिक संमती दिली आहे. ही वीज दिवामार्गे नव्याने तयार होत असलेल्या १३२ केव्ही प्रणालीद्वारे मिळणार आहे. त्यामुळे पाण्याच्या पंपाची कार्यक्षमता शंभर टक्के एवढी होणार आहे. ही क्षमता वाढणार असल्याने २१८ लाख लिटर पाणी पूर्ण क्षमतेने उचलणे शक्य होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ट्रान्सफॉर्मर उभारण्याच्या कामांना वेग
सूर्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली विजेची नवी पारेषण लाईन उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. ही कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानंतर उर्वरित कामेही युद्धपातळीवर केली जाणार असून मीरा-भाईंदरवासीयांना धो-धो पाणी मिळणार आहे. नवीन वीजपुरवठा यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर मीरा-भाईंदरचा पाणीपुरवठा नियमित होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.































































