मुंबईचा मुद्दा पेटला! सारवासारव करताना देवाभाऊंची दमछाक

‘आयआयटी बॉम्बेचे नाव मुंबई असे झाले नाही यामुळे मी खूश आहे,’ केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या या संतापजनक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठी आणि मुंबईच्या ओळखीचा मुद्दा पेटला आहे. आयआयटी बॉम्बे कशासाठी मुंबई का नाही, असा संताप सर्वत्र व्यक्त केला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआयटी मुंबई असे नामकरण करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार, अशी सारवासारव केली आहे.

बॉम्बेच्या खुणा या मिटल्या पाहिजेत आणि सगळीकडे मुंबईच असले पाहिजे. आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई असे करण्याची विनंती करणारे पत्र मी स्वतः देशाचे पंतप्रधान आणि मानव संसाधन मंत्र्यांना लिहिणार आहे.

मुंबईचे नाव मराठी इतिहास, मराठी संस्कृती आणि या भूमीच्या मूळ देवी मुंबाशी जोडलेले आहे. त्यामुळे मुंबईऐवजी बॉम्बेचा आग्रह व्यक्त करणे ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या अभिमानावर घाला असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राज्य शासनाने 1995 पासून अधिकृतरीत्या बॉम्बेऐवजी ‘मुंबई’ हे नाव स्वीकृत केले असून सर्व कार्यालयीन, प्रशासकीय, कायदेशीर व्यवहारात ‘मुंबई’ हेच अधिकृत नाव आहे. मग, आयआयटी बॉम्बेचे आयआयटी मुंबई असे नाव का केले जात नाही, अशी विचारणा होऊ लागली आहे. राजकीय वर्तुळातूनही याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.