
राज्यात सध्या सत्ताधारी महायुतीतील तीन पक्षांमध्ये राज्याची तिजोरी कोण नियंत्रित करतो यावरून उघडपणे स्पर्धा रंगलेली आहे. प्रत्येक पक्ष आपल्याकडेच आर्थिक निर्णयांची लगाम असल्याचा दावा करत असताना या राजकीय चढाओढीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.
बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, कामावरून मतं मागण्याची पद्धत आता दिसत नाही. ‘पैसे देऊ, निधी देऊ’ असं सांगून मतं मागितली जात आहेत. अर्थकारणाचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा हा दृष्टिकोन योग्य नाही. महायुतीतील तिन्ही पक्षांनी निधी वाटपावरून जे प्रदर्शन सुरू केले आहे, ते लोकशाहीसाठी चांगले संकेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या निवडणुकीबाबत बोलताना पवार म्हणाले की, त्यांनी अनावश्यक राजकीय वादांपासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या मते, या निवडणुकीत ठिकठिकाणी नवीन गटबाजी तयार झाल्या आहेत. एक पक्ष दुसऱ्याबरोबर जातोय म्हणजे अंतर्गत एकवाक्यता नाही, हे स्पष्ट दिसतं. तथापि, मतदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत पवार म्हणाले की, लोक योग्य तो निर्णय मतदानातून देतील. राजकीय गोंधळात स्वतःचा सहभाग मर्यादित ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही आताही आणि यापूर्वीही अशा गोष्टींमध्ये पडलो नाही. आता काहीच दिवस शिल्लक आहेत. काय घडतंय ते पाहू, असे शरद पवार म्हणाले.



























































