
वाजत गाजत लग्नमंडपात चाललेल्या नवरदेवाच्या गाडीने वऱ्हाड्यांनाच चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात वरपित्याचा जागीच मृत्यू झाला असून नवरदेवाचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सार्वजनिक आरोग्य केंद्रात पाठवला.
ओडिशातील बलांगीर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अमपाली गावातील तरुणाचे मंडल गावातील तरुणीसोबत लग्न ठरले होते. मंगळवारी रात्री हा विवाहसोहळा पार पडणार होता. यासाठी नवरदेव वऱ्हाड्यांसह वाजत गाजत विवाहस्थळी चालला होता. वऱ्हाडी नाचण्यात दंग असतानाच अचानक नवरदेवाच्या गाडीचा स्पीड वाढला आणि कार वऱ्हाड्यांना धडक देत पुढे गेली.
अपघातात नवरदेवाच्या वडिलांचा मत्यू झाला. घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी नवरदेवाच्या भावावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेमुळे लग्नघरावर दुःखाचा डोंगर कोसळला. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


























































