
एसटी महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये मातृभाषा मराठीची गळचेपी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’ यांसारख्या आरामदायी बसेसमध्ये मराठी भाषेला डावलून हिंदी भाषेत सूचना लिहिल्या आहेत. एसटी महामंडळाच्या या धोरणाविरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. मराठीचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा देत समितीने परिवहनमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
मुंबईतील प्रवासी थांब्यांवरील अधिकृत लोगोमधून ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख हटवण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न नुकताच समोर आला. त्यासंदर्भात दै. ‘सामना’ने वृत्त प्रसिद्ध करताच महामंडळाने चूक सुधारली. त्यापाठोपाठ एसटीच्या बसगाड्यांमध्ये मराठी भाषेची गळचेपी करण्याचा महामंडळाचा प्रयत्न मराठी एकीकरण समितीने उजेडात आणला आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’ तसेच इतर बसगाड्यांमध्ये हिंदी भाषेत सूचना, फलक, जाहिराती लावल्या जात आहेत. हिंदी आणि इंग्रजी भाषेत सूचनांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. यावर तीव्र आक्षेप नोंदवून मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली.
परिवहनमंत्र्यांकडून चौकशीचे आश्वासन
महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणाऱ्यांची चौकशी करून जबाबदार लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली. त्याची दखल परिवहनमंत्र्यांनी घेतली आणि आवश्यक ती चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.





























































