
येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिह्यातील 12 नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. या निवडणुकीत जिह्यातील महिला मतदारांची निर्णायक ताकद विशेषत्वाने जाणवत आहे. जिह्यातील 12 नगरपालिकांपैकी सात ठिकाणी महिलांची मतदारसंख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याने, ‘मातृशक्तीचे मत’ कोणाकडे झुकतंय, यावरच निकालांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
अहिल्यानगर जिह्यातील 12 नगरपालिकांसाठी यंदा 4 लाख 51 हजार 284 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 2 लाख 27 हजार 628 महिला, तर 2 लाख 23 हजार 586 पुरुष मतदार आहेत. महिला मतदार पुरुषांपेक्षा 4 हजार 42 जास्त आहेत. निवडणुकीपूर्वी महिलांकडे झुकलेला हा आकडा राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता बाळगतो. विशेषतः गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘लाडक्या बहिणीं’नी महायुतीला दिलेली आघाडी अद्याप राजकीय स्मरणातून गेलेली नाही. त्यामुळे सर्व पक्ष महिलांच्या समर्थनासाठी धडपडताना दिसत आहेत.
अहिल्यानगर जिह्यातील अनेक पालिकांत महिला आघाडीचा कल असून, श्रीरामपूर नगरपरिषदेत सर्वाधिक 2 हजार 464 महिला या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहेत. कोपरगावात 1 हजार 179, संगमनेरात 934, नेवाशात 128, राहुरीत 92, शेवगावात 33, तर शिर्डीत 24 महिलांची आघाडी आहे. या सर्व ठिकाणी महिला मतदारांचे प्रश्न, त्यांचे कल, आर्थिक-सामाजिक प्राधान्ये आणि स्थानिक नेतृत्वावरच्या विश्वासाचे समीकरण निर्णायक ठरणार आहे. राहाता, पाथर्डी, श्रीगोंदा, देवळाली आणि जामखेड येथे पुरुषांची संख्या किंचित जास्त असली, तरी फरक मात्र जास्त नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वस्वी स्थानिक प्रश्नांवर लढल्या जातात. यामध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, सुरक्षेचे प्रश्न, वीज आणि स्थानिक सुविधा हे सर्व विषय महिलांच्या दैनंदिन जगण्याशी थेट जोडलेले असल्याने महिलेचा निर्णय अधिक संवेदनशील आणि परिणामकारक ठरतो. महिलांचा निर्णायक कल कोणाकडे झुकतो, यावरच निकाल अवलंबून असेल, इतके मात्र नक्की.
पालिकानिहाय स्त्री-पुरुष मतदारसंख्या
देवळाली प्रवरा – पुरुष (12,027) स्त्री (11,830). जामखेड – पुरुष (16,749) स्त्री (16,412), कोपरगाव – पुरुष (31,135) स्त्री (32,314), नेवासा – पुरुष (9,292) स्त्री (9,420), पाथर्डी – पुरुष (11,633) स्त्री (11,609), राहाता – पुरुष (9,766) स्त्री (9,698), राहुरी – पुरुष (16,589) स्त्री (16,681), संगमनेर पुरुष (28,390) स्त्री (29,324), शेवगाव – पुरुष (17,721) स्त्री (17,754), शिर्डी – पुरुष (16,792) स्त्री (16,816), श्रीगोंदा – पुरुष (14,256) स्त्री (14,070), श्रीरामपूर – पुरुष (39,236) स्त्री (41,700).


























































