महाराष्ट्राचा बिहार झालाय! काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

श्रीरामपूर येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली जाते. सध्या महाराष्ट्रात असेच प्रकार होत असून, हे सर्व नेमके कोणाच्या संरक्षणाखाली घडतेय, असा सवाल करत ‘महाराष्ट्राचा बिहार झालाय, मुख्यमंत्री फडणवीस यांना नेमका महाराष्ट्र कसा पाहिजे’, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

सचिन गुजर यांचे अपहण करून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. यात जखमी गुजर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सचिन गुजर यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. यानंतर ते बोलत होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्राचा बिहार होतोय, हिंदुत्ववादी संघटना आता हल्ले करू लागले आहेत. हे सर्व नेमके कोणाच्या संरक्षणाखाली घडते आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांना नेमका कसा महाराष्ट्र पाहिजे. ही तर गुंडशाही झाली आहे. भाजपाला स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पराभव दिसू लागल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अपहरण करून मारहाण केली जात आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.