
बीएसयूपी प्रकल्पात वाटप केलेल्या घरांचे अवघ्या १०० रुपयांमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला खरा. मात्र या योजनेत करारनामे न करताच सहा हजार लाभार्थ्यांना घराचा ताबा देण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. याबाबत पालिका आयुक्तांना पत्रही देण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यात बीएसयूपी योजनेत घपला तर झाला नाही ना, असा सवाल करण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेने झोपडपट्टीच्या ठिकाणी इमारती उभारून शहरातील गोरगरीब तसेच आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबीयांना घरे दिली. महापालि केच्या समाज विकास विभागाकडून काही वर्षांपासून टप्प्याटप्यात ६ हजार २० कुटुंबांना सदनिकांचा ताबा देण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र महापालिका व संबंधित सदनिकाधारक यांच्यात अद्याप करारनामेच झाले नसल्याचा आरोप माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना पत्र देत लक्ष वेधले आहे. दरम्यान, या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुमारे ५६ हजार ते १ लाख ३४ हजार रुपये एवढा अधिभार भरावयास लागणार असल्याने आता सदनिकाधारकांनी विरोध केला आहे.
उद्दिष्टांपेक्षा कमी घरे बांधली
दुसरीकडे जवळपास ३४१ कोटींचा निधी खर्च करून बीएसयूपी योजनेतून तब्बल ९ हजार ४२६ सदनिका बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ६ हजार २० एवढ्याच सदनिका बांधण्यात आल्या आहेत. दरम्यान, उद्दिष्टांपेक्षा कमी घरे बांधली गेली असताना बीएसयूपी योजनेसाठी आलेला कोट्यवधींचा निधी नेमका कुठे गेला? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.




























































