
जिल्ह्याचा थोरला दवाखाना म्हणून गोरगरिबांच्या आरोग्यसेवेसाठी असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) गेल्या काही वर्षांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे एक भ्रष्ट रॅकेट दलालांमार्फत सुरू आहे. यामध्ये काही वैद्यकीय डॉक्टरांसह शिपायांचाही समावेश असून, यांचे दरपत्रक वेगवेगळे असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
जिह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत, तर हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. आपल्या तक्रारीनंतर एका प्रकरणात हृदय शस्त्रक्रिया झाली नसल्याचे चौकशीत उघड झाले. 10 शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रातही विसंगती आढळून आली. तरीसुद्धा संबंधितांवर कारवाई होत नाही. त्यामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय करणाऱ्या दोषींवर फौजदारी दाखल करावी; अन्यथा अधीक्षकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यासह प्रसंगी न्यायालयीन लढाई लढू, असा इशाराही संजय पवार यांनी दिला.
आपल्या तक्रारीनंतर चौकशी समितीकडूनही राजकुमार वाघमोडे या शिक्षकाची हृदय शस्त्रक्रिया ‘सीपीआर’मध्ये झाली नसल्याचे तसेच त्यांनी सादर केलेले डिस्चार्ज कार्ड खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय नेत्र विभागामार्फत एकूण 31 शिक्षकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 10 शिक्षकांना पडताळणीसाठी हायर सेंटरकडे पाठवण्यात आले, तर 10 शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रात विसंगती आढळून आल्याचेही अहवालात स्पष्ट होत असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
हे सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून, पैशांच्या हव्यासापोटी खऱ्या अपंग लाभार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. पदाचा दुरुपयोग करून जर का वरिष्ठ डॉक्टर बोगसगिरी करून शासनाची फसवणूक करणार असतील तर त्यांना तातडीने निलंबित करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच या सर्व डॉक्टरांच्या कारकिर्दीत दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे शासनाने आदेश द्यावेत, अशी मागणीही पवार यांनी केली.
वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी ही यंत्रणा मोडित काढण्यासाठी संबंधित विभागाचे अधिष्ठाता, उपसंचालक यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे संबंधित सर्व डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावेत, अशी मागणीही शिवसेना उपनेते संजर पवार यांनी केली.
शिपायाकडे दोन-दोन जेसीबी
दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व दलाल सावज शोधून कोट्यवधी रुपयांची माया जमवत आहेत. अशा या भ्रष्ट साखळीमुळे खरे दिव्यांग लाभार्थ्यांचे नुकसान होत आहे. अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक अशा बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर नोकरी, बढती व बदली आदी कारणांसाठी करत आहेत. हे सर्वजण शासनाची फसवणूक करीत आहेत. काही वरिष्ठ डॉक्टरांनीही या साखळीत आपल्या पदाचा गैरवापर करून अमाप पैसा मिळवल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनबाहेरील शिपायाकडे दोन-दोन जेसीबी कसे, असा सवाल संजय पवार यांनी उपस्थित केला.





























































