
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात एक भलामोठा कंटेनर गुरुवारी दुपारच्या सुमारास बंद पडला. वाहतूक विभागाकडून बंद कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू असताना क्रेनसह मणका मोडलेला कंटेनर अचानक भररस्त्यात आडवा झाला. कंटेनर बाजूला करण्यास वेळ लागल्याने भाईंदरपाड्यापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी क्रेनचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, तासाभरानंतर गायमुख घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.



























































