
श्रीलंकेत सध्या दित्वा चक्रीवादळाने थैमान घातले आहे. वादळामुळे देशातील हवामानावर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे कोलंबोला जाणारी पाच विमाने तिरुअनंतपुरम विमानतळावर वळवण्यात आली आहेत. कोलंबोलाही चक्रीवादळाचा संभाव्य धोका असल्याने आणखी विमाने तिरुअनंतपुरमकडे वळवण्यात येण्याची शक्यता असल्याचे विमानतळ प्राधिकारणाने सांगितले.
तिरुअनंतपुरम विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, कोलंबोला खराब हवामानामुळे शुक्रवारी मध्य पूर्वेतील तीन तर मलेशिया आणि हिंदुस्थानच्या प्रत्येकी एक अशी श्रीलंकेला जाणारी पाच विमाने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली. एतिहाद एअरवेजचे विमान पहाटे 3.44 वाजता, एअरएशियाचे विमान पहाटे 4.37 वाजता, श्रीलंकेतील एअरलाइन्सची विमाने सकाळी 7.44 वाजता आणि इंडिगोचे विमान सकाळी 9.49 वाजता तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरवण्यात आले.



























































