
>> राजेश चुरी
मुंबईतल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांची तुडुंब गर्दी, वाढते ध्वनी आणि वायू प्रदूषण, अपुऱया नागरी सुविधा, घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती, महागाई, मुंबईतील महागडे राहाणीमान यामुळे मुंबईकर कमालीचा त्रस्त झाला आहे. ट्रेनमधील गर्दी, प्रदूषण, घरांच्या वाढत्या किमती कमी करून आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या, असा टाहो मुंबईकरांनी राज्य सरकारकडे पह्डला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र 2047’ साठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ करण्याचा समावेश करण्यात आला आहे. विकसित महाराष्ट्र 2047 च्या संदर्भात राज्यातील नागरिकांची मते, अपेक्षा अभिप्राय, आकांक्षा जाणून घेण्यासाठी नियोजन विभागामार्फत माहिती व जनसंपर्क विभागाच्या मदतीने राज्यस्तरीय सर्वेक्षण करण्यात आले. मुंबईसह संपूर्ण राज्यातील 3 लाख 88 हजार 835 नागरिकांनी व्हॉट्सअॅप, चॅटबॉट आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मते नोंदवली. 35 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी व्हॉईसनोटद्वारे मते मांडली. त्यानंतर आता नागरिकांच्या सर्वेक्षणाचा तपशील जाहीर करण्यात आला. त्यातून मुंबई शहर आणि उपगनरवासीयांच्या आशाआकांक्षा, अपेक्षा आणि चिंता पुढे आल्या आहेत.
मुंबईकरांच्या सरकारकडून अपेक्षा
नोकरीच्या ठिकाणाच्या जवळ परवडणारी घरे बांधा
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करून आमची वाहतूककोंडीतून सुटका करा.
सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता व्यवस्था सुधारा
पोर्टलद्वारे परवाने, प्रमाणपत्रे आणि तक्रारी सोडवा
पाणीपुरवठय़ात सुधारणा आणि पाणी वितरणातील तफावत दूर करण्यासाठी स्मार्ट मीटरचा वापर करा.
शहरवासीयांच्या मागण्या
मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे सेवेचा शेवटच्या टोकापर्यंत विस्तार करा
सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे उपनगरात परवडणारी घरे बांधा
मोकळ्य़ा जागांवर हिरवळ आणि जलायश निर्माण करा
सार्वजनिक वाहतूक सेवेवरील ताण कमी करा
घरांच्या वाढत्या किमती आटोक्यात ठेवा
वाहतूककोंडी आणि अपघातांचे वाढते धोके यातून मार्ग काढा
उपनगरवासीयांना भेडसावणाऱ्या समस्या
खर्चिक राहणीमान आणि परवडणाऱया घरांचा अभाव
रस्ते, पाणी आणि गटारे या पायाभूत सुविधांवरील वाढता ताण आणि अपुऱ्या सेवासुविधा
महापालिका कार्यालयांमध्ये परवानग्या आणि तक्रारी सोडवण्यातील विलंब
पारदर्शकतेचा, दर्जेदार शिक्षणाचा आणि आरोग्य सुविधांचा अभाव
वाहने आणि बांधकामांमुळे वायू व ध्वनी प्रदूषण
प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या लोकल ट्रेन






























































